नवरदेवाने कट्ट्यार हातात घुसवली, पुण्यात अजब प्रकार
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न समारंभ म्हटलं की खूप आनंदाचा क्षण मानला जातो. या आनंदाच्या कार्यात सर्वजण आनंदी असतात. पण अशा आनंदाच्या वातावरणात पुण्यात एका नवरदेवाने आपल्याजवळ असलेल्या कट्ट्यारीने मंगल कार्यालयाच्या मालकावर हल्ला केला.
अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 9 जानेवारी 2024 : पुण्यात नवरदेवाचा अजब प्रताप समोर आला आहे. नवरदेवाने ऐन लग्नाच्या दिवशीच एकावर चक्क हातातील काट्यारीने वार केला. त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे. नवरदेवाने किरकोळ वादातून विवाह समारंभात मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला. त्यामुळे नवरदेवावर विवाहाच्या दिवशीच गुन्हा दाखल झालाय. करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी नवरदेव अभिजीत मिरगणे याच्यासह राहुल सरोदे आणि इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार 6 जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मंगल कार्यालयातच घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता.
नेमकं काय घडलं?
विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.
यावेळी नवरदेव असलेल्या अभिजीतने सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर कट्यारीने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी तातडीने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.