पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरांच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. फरार आरोपींचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करुन त्याला जामीन मिळू नये याची
दक्षता घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Hidden Camera in Lady Doctor’s Staff Quarter Bathroom Nilam Gorhe asks Police not to give bail to accuse)
काय आहे प्रकरण?
पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये अज्ञात व्यक्तीने कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब चार दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर पीडित महिलेने 6 जुलै 2021 रोजी तक्रार नोंदवली. “पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी. महिलांच्या रुममध्ये असे कॅमेरे बसवण्याची बाब धक्कादायक आहे. अशाप्रकारे महिलांची होणारी फसवणूक ही गंभीर आहे” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संबंधित बातम्या :
डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल
(Hidden Camera in Lady Doctor’s Staff Quarter Bathroom Nilam Gorhe asks Police not to give bail to accuse)