पुणे शहरातील गुन्हेगारी वाढण्याचे कारण… सांस्कृतिक शहर कसे बदलत गेले?

Pune Crime: कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात पुण्यातून होते. आता पुणेकरांनी राजकारण्यांना जाब विचारायला हवा. गुंडांना आश्रय देणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवयाला हवी. त्यासाठी पुन्हा एकदा पुणेकरांनी मोहीम सुरु करायला हवी. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवे.

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढण्याचे कारण... सांस्कृतिक शहर कसे बदलत गेले?
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 1:10 PM

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. विरोधकही सरकारला धारेवर धरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुणे शहरातील गुंडगिरी मोडून कोण काढणार? पोलीस आपली ही जबाबदारी केव्हा पार पाडू शकणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आधी पाहू या गेल्या काही महिन्यात महत्वाच्या घडलेल्या गुन्हेगारी घटना..

  1. 1 सप्टेंबर 2024 : पुणे येथील नाना पेठेत वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला.
  2. 1 सप्टेंबर 2024 : पुणे शहरातील हडपसर भागात फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेले वासुदेव कुलकर्णी यांचा खून.
  3. 23 ऑगस्ट 2024 : सराईत गुंड हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ याचा सिंहगड रोडवर खून.
  4. 17 मार्च 2024 : गुंड अविनाश धनवे इंदापूरमधील हॉटेलात जेवण्यास बसला असताना आधी गोळ्या मारल्या मग कोयत्याना हल्ला.
  5. 5 जानेवारीला 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भर दुपारी गोळीबार.

वरील या पाच घटना प्रातिनिधिक आहेत. या घटना उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील नाही. महाराष्ट्रातील आहेत. त्यातल्या त्यात सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यातील आहेत. होय, सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यातील आहेत. जुन्या पुणेकरांना हे सत्य पचवणे अवघड आहे. परंतु आता पुणे बदलले आहे. शिक्षण, उद्योग, संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे शहर टोळी युद्ध, हल्ले, खून यासारख्या वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे दहशतीत आहेत. पुण्यात पोलीस आहेत. पण त्यांचे हात बांधले गेले आहेत. गुंड अन् गुडांच्या टोळ्यांना राजाश्रय (राजकीय आश्रय) मिळत आहे. यामुळे खून, अत्याचार, कोयता हल्ले हे पुण्यात नित्याचेच झाले आहेत. आता पुणे शहरात 1 सप्टेंबर रोजी नाना पेठे सारख्या गजबजलेल्या भागांत गुंड वनराज आंदेकर यांची रात्री नऊ वाजता हत्या झाली. त्यानंतर हडपसरमध्ये शतपावली करण्यासाठी निघालेल्या वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली. पुण्यातील गुंड टोळ्या क्षुल्लक कारणावरुन हल्ले करत आहेत. या घटनांनी पुणेकर पुन्हा हादरले आहे. दहशतीत आले आहेत.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील गुन्हेगारी टोळीची अशी झाली सुरुवात

वनराज आंदेकर याच्या हत्येनंतर आंदेकर टोळीची चर्चा सुरु झाली आहे. चार दशकांपासून पुण्यातील मध्यवर्ती भागात आंदेकर टोळीची दहशत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा इतिहास पाहिल्यास तो 1980 च्या दशकातील आहे. काही वर्षांपूर्वी मध्यवस्तीत काही छोट्या-मोठ्या टोळ्या होत्या. त्यापैकी बाळकृष्ण ऊर्फ बाळू आंदेकर टोळीचा मटका, जुगार, अवैध दारु विक्रीचा प्रमुख व्यवसाय होता. 1980 मध्ये नाना पेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी प्रमोद माळवदकर आणि आंदेकर टोळीत वर्चस्ववादाची लढाई सुरु झाली. त्यातून माळवदकर टोळीने 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा खून केला. त्यानंतर टोळीयुद्धाचा भडका उडाला. हे गँगवॉर जवळजवळ 10 वर्षे चालले. त्यात 6 ते 8 गुंडांची हत्या एकमेकांकडून करण्यात आली.

पुणे शहराचा विकास अन् गुंडगिरीचा विकास

1990 च्या दशकात पुणे शहराचा विस्तार आणि विकास होऊ लागला. त्यानंतर जमिनीची किंमती प्रचंड वाढल्या. जमिनीला सोन्याचे भाव आले. त्यामुळे जमिनींच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये मिळू लागले. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष या व्यवसायाकडे गेले. त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले. 2000 मध्ये पुण्यात आयटी पार्क आले. एमआयडीसी आणि उद्योगधंद्याचा विस्तार झाला. त्यामुळे पुण्याकडे बड्या बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष गेले. त्यांचे प्रस्थ पुणे शहरात वाढू लागला. मग या बांधकाम उद्योगासाठी जमिनीचे व्यवहार करणारे एजंट आले. त्यांच्यात व्यवहार मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. त्यामुळे दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. मग कोणाला किती पैसे मिळत आहे? कोण अधिक कॉन्ट्रॅक्ट घेत आहे? आयटीपार्कवर कोणाचा ताबा आहे? कामगार वर्ग कोणाकडे आहे? यासाठी या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद सुरु झाला.

आंदेकर टोळी अन् कुटुंबीय राजकारणात

पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला. तो मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी 1997 मध्ये प्रमोद माळवदकर याचे एन्काउंटर केले. त्यानंतर नाना पेठेत आंदेकर टोळीचे वर्चस्व वाढत गेले. टोळीचा सूत्रधार सूर्यकांत उर्फ बाळू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी राजकारणात एन्ट्री केली. 1998 मध्ये आंदेकर कटुंबातील वत्सला आंदेकर पुण्याचा महापौर झाल्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर 1992 मध्ये नगरसेवक झाले. त्याची आई राजश्री आंदेकर 2007, 2012 मध्ये नगरसेविका झाली. त्यानंतर वनराज 2017 मध्ये नगरसेवक झाले. मग आंदेकर टोळीला राजकीय आश्रम मिळाल्यामुळे त्यांची दहशत वाढत गेली. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ गायकवाड हा पूर्वी आंदेकर टोळीत होता. त्यानंतर त्याने स्वत:ची टोळी काढली. आंदेकर टोळीने वर्षभरापूर्वी गायकवाड याच्या साथीदाराचा खून केला होता.

मारणे गँग अशी वाढत गेली

पुण्यातील गुंड गजानन मारणे आणि गुंड शरद मोहोळ हे दोघेही मुळशी गावातील आहे. त्यानंतर 2000 मध्ये पुण्यातील कोथरूड भागात राहायला आले आणि पुण्यात दादागिरी करण्यास सुरुवात केली. गणेश मारणे, गजानन मारणे, संदीप मोहोळ यांच्या टोळ्या उदयाला आल्या. मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची 2006 मध्ये बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळ याने हत्या केली होती. या हत्येनंतर पुण्यात खऱ्या अर्थाने टोळीयुद्धाला सुरुवात झाली. या हत्येचे प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळ याची हत्या केली होती.

गुंडांना राजकीय आश्रयामुळे पोलिसांचे हात बांधले

गुंड शरद मोहोळ असो की वनराज आंदेकर हे किंवा त्यांचे कुटुंबीय राजकारणात आले. त्यांच्यासारख्या गुंडांना सर्वच राजकीय पक्ष प्रवेश देऊ लागले. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाली. सध्या गुंडांनी खासदार, मंत्र्यांचा सत्कार केल्याचे फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कधी काळी मुंबईसारख्या मायानगरीमध्ये, देशाच्या या आर्थिक राजधानीत गँगवॉर होते. गुंडांच्या टोळ्या होत्या. त्याच्या अनेक कहाण्या आल्या आहेत. काही जणांवर चित्रपटही आले आहेत. मग पोलीस दलातील अधिकारी विजय साळस्कर, राकेश मारिया, दया नाईक, प्रदीप शर्मा यांच्यासारख्या अनेक जणांनी मिळून हे गँगवार मोडून काढले. कारण त्यावेळी राजकीय हस्तक्षेप झाला नाही. त्यांना खुली सुट मिळाली. मग देशातील शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्या वाढल्या आहेत? त्या का रोखल्या जात नाहीत. हत्या, खंडणी, अपहरण, जमिनीचे व्यवहार, रिअल इस्टेटचे वाद, अवैध वाळू उपसा या सर्व घटना, घडामोडीचे केंद्र पुणे झाले आहे. मग पुण्यातील ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी कोणताही पोलीस अधिकारी पुढे का येत नाही? कारण पुण्यातील राजकीय पक्षांनी गुन्हेगारांच्या चारित्र शुद्धीकरणाचा नवा पायंडाच सुरू केला आहे. कुख्यात गुंड खादीचे पांढरे शुभ्र कपडे परिधान करून समाजात ताठ मानेने वावरत आहेत.

गुंडांना राजकीय पाठबळ का?

गुंड आणि त्यांच्या नातेवाइकांना राजकीय पक्षात प्रवेश देऊन राजकीय पक्ष काय साध्य करतात? हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. ‘मनी, मसल, माफिया’ ही निवडणूक जिंकायची त्रिसुत्रीसाठी गुंडांना राजकीय आश्रय दिला जाते. ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या नावाखाली गुंडांचा वापर राजकीय पक्ष करु लागले आहेत. यामुळेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. पर्यायाने कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस यंत्रणेत हस्तक्षेप ही नित्याची बाब झाली आहे. एखाद्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली की, त्याला सोडवण्यासाठी फोन येतो. अधिकाऱ्यांवर दबाब आणला जातो. मग पोलीस अधिकारी गुन्हेगारांना ठेचणार तरी कसे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पुण्याचा हा राजकीय इतिहास का विसरताय?

पुण्यातील राजकीय इतिहासात नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, एस. एम. जोशी यांच्यासारखी मातब्बर मंडळींचे नाव घेतले जाते. त्यांच्यासारख्या लोकांनी सर्वस्वाचा त्याग करून राजकारण केले. परंतु त्यांनी कधी राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ दिले नाही. आताचे राजकारण विचारांऐवजी आर्थिक आणि गुंडगिरीची साथीवर आले आहे. हे दुर्देवच म्हणावे लागणार आहे.

राजकीय व्यक्तींच्या पुण्यात झालेल्या हत्या

  1. २००३ – भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची छोटा राजन टोळीकडून हत्या, सर्व आरोपी निर्दोष सुटले
  2. २०२१ – शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, राजकीय वैरातून हत्या.
  3. २०२३ पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या.

अन्यथा पुन्हा पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात पुण्यातून होते. पुणेकर देशात आदर्श निर्माण करतात. आता पुणेकरांनी राजकारण्यांना जाब विचारायला हवा. गुंडांना आश्रय देणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवयाला हवी. त्यासाठी पुन्हा एकदा पुणेकरांनी मोहीम सुरु करायला हवी. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवे. मग पोलीस गुंडांचा कसा बंदोबस्त करतात, ते सर्वांना दिसणार आहे. आता हा बदल करण्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी इच्छाशक्ती दाखवली तरच पुण्यातील गुन्हेगारी संपणार आहे… अन्यथा पुन्हा पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ अटळ आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.