पुणे : पुणे शहरात कोयता गँगने (koyta gang) धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर (Crime News) कारवाई केली असली तरी गुन्हे कमी होत नाही. कोयता गँगवर मकोका लावणे, कोंबिंग ऑपरेशन राबवणे, दहशतवाद्यांची यादी करणे अशी कामे पोलीस करत आहेत. परंतु त्यानंतरही गुन्हेगारी कमी होत नाही. दोन दिवसांपुर्वी पुणे शहरात काही तासांमध्ये दोन वेळा गोळीबार झाला होता.
आता इस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्यावरुन दोन गटात तुंबड हाणामारी झाली. उरळीकांचन परिसरात बारावीमध्ये शिकणाऱ्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. अगदी लाकडी दांडके, हॉकी स्टीक, लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली. या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
नेमके काय घडले
अल्पवयीन मुलगा मित्रांसह कॉलेजचा परिसरात थांबला होता. त्यावेळी तिथे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पुष्पा सिनेमाचे स्टेटस का ठेवले हे विचारले. त्याने कारण सांगण्यास नकार दिला. यामुळे दुसऱ्या गटातील लोकांनी शिवीगाळ व हाणामारी केली. ही हाणामारी हॉकी स्टीक, लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी झाली. या प्रकरणात दोन्ही गटातील मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपुर्वी दोन वेळा गोळीबार
पुण्यात दोन दिवसांपुर्वी दोन वेळा गोळीबार झाला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून बांधकाम व्यावसायिक संतोष पवार व रमेश बद्रीनाथ राठोड या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर संतोष पवार याने रमेश राठोडवर गोळीबार केला. या घटनेत रमेश यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्या ठिकाणांवरुन सिंहगड रोड पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. संतोष पवार यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे. त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील असतो.