पुणे : मशिनमध्ये स्कार्फ अडकल्यामुळे नवविवाहितेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जनावरांसाठी कुट्टी करत असताना मशिनमध्ये स्कार्फ आणि केस गुंतल्याने तरुणीला गळफास बसला. त्यामुळे श्वास गुदमरुन 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आह.
बाईकमध्ये ओढणी किंवा साडीचा पदर अडकून गळफास बसल्याच्या घटना आतापर्यंत अनेक वेळा समोर आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार महिलांना ओढणी सांभाळून बसण्याचे आवाहन केले जाते. अशाच प्रकारे मशिनरी हाताळताना बाळगलेली काहीशी निष्काळजी जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे असाच एक दुर्दैवी प्रकार घडला आहे. या अपघातामध्ये 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे. सोनाली दौंड असं यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील लाखनगाव येथे राहणारी सोनाली दौंड घरातील जनावरांना चारा देण्यासाठी कुट्टी मशिनमध्ये चारा टाकत होती. यावेळी कुट्टी मशीनमध्ये तिचा स्कार्फ आणि केस अडकला, असा दावा केला जात आहे. स्कार्फ अडकून गळफास लागल्याने काही समजण्याच्या आतच सोनालीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे सोनालीचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सोनालीच्या सासर-माहेरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या :
थुंकताना पाय घसरला, ग्रीलमध्ये गळा अडकून नवऱ्याचा मृत्यू, बायको घराबाहेर येईपर्यंत होत्याचं नव्हतं!
दारुच्या नशेत महाशिवरात्रीची पूजा, त्रिशूळात मान अडकून वृद्धाचा मृत्यू
लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना