पुणे : पती-पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे हा प्रकार घडला. भंगार विकलेल्या पैशाच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडले असल्याचं उघड झालं आहे.
काय आहे प्रकरण?
पती किसन वाघ आणि पत्नी मोंढाबाई वाघ या दाम्पत्याची हत्या झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील कचरा डेपोजवळ रात्री धारदार शस्त्राने वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
दोघांना अटक, तिसरा पसार
या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी आरोपी मंगेश सईद, सोन्या मुकणे आणि जगन मुकणे या तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा घोडेगाव पोलिसांकडून शोध सुरु आहे.
विरारमध्ये क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या
दरम्यान, घराजवळ कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्व भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेची पतीनेच हत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. त्यानंतर चौकशीदरम्यान हत्येचं चक्रावून टाकणारं कारण समोर आलं आहे. पतीने रविवारी रात्री माहेरी येऊन केलेल्या हल्ल्यात पत्नीला प्राण गमवावे लागले, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीचा शोध सुरु आहे.
विरारमधील कॉम्प्लेक्समध्ये थरार
मयत सुप्रिया जगदिश गुरव (वय 28 वर्ष) आणि तिचा पती जगदिश हे वसई रेल्वे स्थानकाबाहेर तिकीट विक्री करणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. सुप्रियाची 47 वर्षीय आई सुषमा शेट्टी यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला. सुषमा शेट्टी विरारमधील नरेंद्र ब्रह्म कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये राहतात. तर जावई जगदिश आणि मुलगी सुप्रिया जवळच भाड्यावर घर घेऊन राहतात.
शेजाऱ्यांसोबत वाद
जगदिशच्या घरासमोर त्यांच्या शेजाऱ्यांनी कपडे वाळत घातल्यामुळे दोघांचा मोठा वाद झाला. यावेळी जगदिशने माहेरी गेलेल्या सुप्रियाला फोन केला आणि भांडण्यासाठी बोलावलं. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला. बायकोने दिलेल्या नकारामुळे जगदिशचा पारा चढला आणि तो तडक तिच्या माहेरी येऊन थडकला.
बायकोला भोसकलं, सासूवरही वार
तिथे येऊन त्याने बायको आणि सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला प्रत्युत्तर केलं असता जावई जगदिशने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. हे पाहून सुप्रियाने जगदिशला ढकललं. मात्र जगदिशने स्वयंपाकघरात जाऊन चाकू आणला आणि तिच्या छातीत खुपसला. सासूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्याही हातावर सुरीने वार केले आणि तो घटनास्थळावरुन पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सासू गंभीर जखमी
मायलेकीचा आरडाओरडा ऐकून त्यांचे शेजारी धावत आले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुप्रिया आणि सुषमा या दोघींना जवळच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी सुप्रियाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. तर सुषमाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
आरोपी पतीला दारुचे व्यसन
2020 मध्ये पतीच्या निधनानंतर सासू सुषमा शेट्टी घरकाम करतात. सुप्रिया, जगदिश आणि त्यांची तीन मुलं आधी त्यांच्यासोबतच राहत होती. मात्र नंतर ते भाड्याच्या खोलीत राहायला गेले. जावई जगदिश दारुच्या आहारी गेल्याची माहितीही सुषमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
कपडे वाळत घालण्याचा वाद, शेजाऱ्यांशी भांडायला बायको आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन भोसकलं
ओढणीने गळा आवळून हॉटेलमध्ये पत्नीची हत्या, नाशकात पतीला अटक
प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!