VIDEO | गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं, मग गाडीत भरलं, लोणावळ्यात पशुधन चोरीचा अनोखा प्रकार
रात्रीच्या वेळी गाय-वासरांना बेशुद्ध करून पळवून नेण्याचा प्रकार लोणावळा शहरात उघडकीस आला. लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.
पुणे : गायीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत गोधनाची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागातील संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पशुधन चोरीचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र बेशुद्ध करुन गायीच्या चोरीचा प्रकार समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
रात्रीच्या वेळी गाय-वासरांना बेशुद्ध करून पळवून नेण्याचा प्रकार लोणावळा शहरात उघडकीस आला. लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. भटक्या गायींना बेशुद्ध करत असतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पाव खायला टाकून गायीला भूल देण्यात आली होती. ती बेशुद्ध झाल्यावर चारचाकी वाहनांमध्ये भरुन तिला पळवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा तपास सुरू केला आहे.
पाहा व्हिडीओ :
गुरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत गोधन चोरी, पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागातील घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ pic.twitter.com/dIQXFbNxHk
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
पुण्यात 6 गावांत तब्बल 18 ठिकाणी चोरी
दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत 6 गावांत तब्बल 18 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यामध्ये 4 घरांमधून सोने, चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व चोरीचा थरार घडला असून या सर्व चोरीच्या घटनांत अंदाजे 3 ते 4 लाख रुपये किमतीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. चोरट्यांनी बंद घरांमध्येच या सर्व चोरी केल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
चोरट्यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहाटे दोन पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत गोहे बुद्रुक, डिंबे, कानसे, शिनोली, पिंपळगाव तर्फे घोडा, धोंडबार शिंदेवाडी या 6 गावांतील 18 ठिकाणी जी बंद घरे आहेत, घरमालक बाहेर गावी गेले आहेत अशाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल तसेच घरगुती वस्तूंची चोरी केली आहे. चोरट्यांच्या वाढत्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.
संबंधित बातम्या :