तुझं थोडंच आयुष्य उरलंय, जगायचं असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, पुण्यातील विवाहितेकडे मागणी, भोंदूबाबाला अटक
तुझ्या पोटात तीन गाठी आहेत, त्यामुळे तुझे थोडेच आयुष्य राहिले आहे, जगायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, अशी घृणास्पद मागणी हा भामटा वारंवार महिलेकडे करत होता.
पिंपरी चिंचवड : जादूटोणा करुन महिलेला कमरेखाली अपंग करण्याची भीती घालत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिस स्थानकात महिलेने तक्रार दाखल केली होती.
तुझ्या पोटात तीन गाठी आहेत, त्यामुळे तुझे थोडेच आयुष्य राहिले आहे, जगायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, अशी घृणास्पद मागणी हा भामटा वारंवार महिलेकडे करत होता. विलास बापूराव पवार उर्फ ‘महाराज’ (वय 41, रा. मु. पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असं अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. त्याला बीडवरुन अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
21 डिसेंबर रोजी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. महाराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विलास पवारने महिलेला फोन केला. कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तुझ्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. महिलेला ‘तुझ्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्याचे आयुष्य थोडेसे राहिले आहे’ असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
अश्लील व्हिडीओ पाठवला
ज्या माणसाच्या उजव्या तळहात आणि गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले, तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लिल व्हिडीओ पाठवून त्यात उजव्या हात आणि गुप्तांगावरचे तीळ दाखवले. व्हिडीओ पाठवल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
माझ्याशी शरीरसंबंध ठेवले, तर तुमचे सगळे कुटुंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा, असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करुन पीडीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
भोंदूबाबाला सापळा रचून अटक
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 292, 500, 509 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या मदतीने 25 डिसेंबर रोजी आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला. आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
दोन ट्रकची समोरासमोर धडक, सायकलस्वाराचा चेंदामेंदा, जळगावात भीषण अपघात
सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा
हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू, अपघात की हत्या? शोध सुरु