पिंपरी चिंचवड : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पुण्यातील मावळ भागात तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेताना तरुणाकडे पिस्तुल सापडले.
काय आहे प्रकरण?
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव मावळ येथे कारवाई करत बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. कुणाल बाबाजी हरपुडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वडगाव परिसरात पोलीस रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी कुणालचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पिस्तुल आढळून आले.
अमरावतीत पिस्तुलासह व्हिडीओ काढणारा पोलीस निलंबित
दुसरीकडे, हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं अमरावतीतील पोलिसाला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली.
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी हा व्हिडीओ केला होता. शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्तुलासारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच काही काळातच व्हायरल झाला. शासकीय गणवेश आणि शस्त्राचा चुकीचा उपयोग केल्याने बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबद्दल पोलिस अंमलदार महेश मुरलीधर काळे याला अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी निलंबित केले आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | गणवेशासह पिस्तुल घेऊन व्हिडीओ, अमरावतीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई