पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्यात बाल गुन्हेगारांच्या वाढलेल्या संख्येमुळे पोलिसांची चिंता वाढू लागली आहे. शहरात गेल्या 9 महिन्यात झालेल्या 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे
काही गुन्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांकडून जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस आयुक्तालयाकडून समुपदेशन सुरु करण्यात आलं आहे. पण त्याच बरोबर पालकांनी मुलं काय करतात, याकडे लक्ष द्यावे, असं आवाहन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या 9 महिन्यातील आकडेवारी
*खुनाच्या 10 गुन्ह्यात 18 अल्पवयीन मुलं
*खुनाच्या प्रयत्नाच्या 13 गुन्ह्यात 26 अल्पवयीन मुलं
*लैंगिक अत्याचाराच्या 6 गुन्ह्यात 9 अल्पवयीन मुलं
*वाहन चोरीच्या 40 गुन्ह्यात 40 अल्पवयीन मुलं
*चोरीच्या 20 गुन्ह्यात 20 अल्पवयीन मुलं
*जबरी चोरीच्या 21 गुन्ह्यात 21 अल्पवयीन मुलं
येरवड्यात दुकानं फोडली
काहीच दिवसांपूर्वी येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचं बोललं जात होतं. पुणे जिल्ह्यातील येरवडा परिसरात दहशत माजवण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे मोठे प्रकार वारंवार घडत असल्याचा दावा केला जात आहे.
येरवडा परिसरात वाढती गुन्हेगारी
यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे आणि अशा युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दहशत माजवणाऱ्यांच्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार करण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :
VIDEO | चार अल्पवयीन मुलांचा येरवड्यात हैदोस, हॉकी स्टिकने दुकानांतील सामानाची तोडफोड
कोयत्याचा धाक, लोखंडी पाईपने मारहाण, पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल लुटणारे तिघे जेरबंद