पिंपरी चिंचवड : पूर्ववैमनस्यातून अपहरण करुन तरुणाची हत्या (Kidnap and Murder) केल्याचा प्रकार पुणे (Pune Crime) जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला होता. लक्ष्मण शिंदे याच्या खून प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. कोयाळी भानोबाची (ता. खेड) हद्दीत काळेवस्ती भागातून 13 फेब्रुवारीला लक्ष्मण शिंदे या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. सुनिता शिंदे हिने तिचा पती घरी आला नसल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बुधवारी (16 फेब्रुवारी) त्याचा मृतदेह निकम वस्ती, कोयाळी येथे भीमा नदी पात्रात आढळून आला होता. या प्रकरणी जयवंत पांढरे, कोंडीबा काळे, संतोष काळे आणि शिवाजी कोळेकर यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जुन्या वादातून हत्या करुन आरोपींनी लक्ष्मणचा मृतदेह भीमा नदी पात्रात टाकल्याची कबुली दिली.
लक्ष्मण यशवंत शिंदे (वय 31वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे (दोघेही रा. काळेवस्ती, कोयाळी, ता. खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संतोष लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (दोघेही रा. काळेवस्ती, कोयाळी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण शिंदे यांची पत्नी सुनीता लक्ष्मण शिंदे (वय 27 वर्ष, रा. काळे वस्ती, कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपी आणि लक्ष्मण शिंदे यांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी लक्ष्मण शिंदेचं 13 फेब्रुवारीला दुचाकीवर बसवून अपहरण केलं. सुनिता शिंदेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी सुनील पांढरे आणि कोंडीबा काळे या दोघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी लक्ष्मण शिंदेचं अपहरण करुन लोखंडी रॉडने मारहाण करत त्याचा खून केल्याचं सांगितलं. त्यानंतर मृतदेह भीमा नदीपात्रात टाकून दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली होती. पोलिसांनी शोध घेतला असता भीमा नदीपात्रात लक्ष्मण शिंदेचा मृतदेह सापडला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
संबंधित बातम्या :
सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?
14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या
आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक