पुणे : पुण्यातील चाकणमध्ये डोक्यात दगड घालून केलेल्या अल्पवयीन तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून सोळा वर्षीय मुलाचं अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आरोपी भावासह सात जणांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. मयत तरुण मूळ बिहारचा रहिवासी होता.
काय आहे प्रकरण?
मयत 16 वर्षीय तरुणाने आरोपी अराफत शिकीलकर याच्या बहिणीची छेड काढली होती. याचा मनात राग धरत डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. अराफत शिकीलकर, युसुफ काकर, करण पाबळे, हुजेब काकर, निहाल इनामदार, मन्सूर इनामदार, सोहेल इनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मैदानात आढळला होता मृतदेह
चाकणमध्ये पीडब्ल्यूडीच्या मैदानात काल दुपारच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरची एकंदरीत परिस्थिती बघता त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याचं निदर्शनास आलं. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
आधी अपहरण, मग हत्या
त्यातील आरोपी मन्सूरने अल्पवयीन तरुणाचं दुचाकीवरुन अपहरण केलं होतं. त्याला चाकण मार्केट यार्डच्या समोरील मोकळ्या मैदानात आणलं. तिथे अराफत आणि त्याचे आणखी पाच मित्र उपस्थित होते. या सर्वांनी मिळून मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात प्रहार केला. तर मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घालत त्याची हत्या केली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी युसूफ काकरला अटक केली आहे, तर अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या
दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.
डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार
सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या :
डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?