विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, चिंचवडमध्ये प्रेयसीने लॉजवर बोलावून गळा आवळला
पैगंबर आणि आरोपी तरुणी हे दोघे जण एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पैगंबर हा आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता. तसेच त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता.
पिंपरी-चिंचवड : विवाहित प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीने त्याचा खून केल्याची घटना पुण्यातील चिंचवडमध्ये समोर आली आहे. प्रेयसीने विवाहित प्रियकराला लॉजवर बोलवून कायमचा काटा काढला. पैगंबर गुलाब मुजावर असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर 29 वर्षीय प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मयत पैगंबर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि आरोपी तरुणी हे दोघे जण एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पैगंबर हा आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता. तसेच त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता. याच कारणावरुन त्याचे प्रेयसीशी वारंवार वाद होत होते.
ओढणीने गळा आवळून खून
दोन दिवसांपूर्वी प्रेयसीने पैगंबर याला चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैगंबर यास तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी 29 वर्षीय प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन प्रेयसीच्या हत्येनंतर तरुणाची आत्महत्या
दुसरीकडे, अल्पवयीन मुलीची लॉजमध्ये नेऊन हत्या केलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी पुण्यात घडली होती. मुलीच्या हत्येनंतर पोलीस या तरुणाचा शोध घेत होते. यानंतर 48 तासांनी त्याचा मृतदेह हाती लागला. आपलं पहिलं आणि अखेरचं प्रेम संपलं असून मी या जगाचा निरोप घेतोय, असं व्हॉट्सअप स्टेटस या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलं होतं. यानंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन या तरुणाने जीवन संपवलं होतं.
संबंधित बातम्या :
पुण्यात लॉजवर अल्पवयीन प्रेयसीची हत्या, प्रियकर पसार
इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात, आधी महिलेने जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध, नंतर….
पिंपरीत लॉज आणि बारवर पोलिसांचे छापे, 200 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात