ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, हिंजवडी पोलिसांची भन्नाट कामगिरी
पिंपरी चिंचवडत हिंजवडीमधील साखरे वस्ती भागात 3 ऑक्टोबर रोजी संतोष माने या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करुन संतोषची हत्या करण्यात आली होती
पिंपरी चिंचवड : घरासमोर वाळत घातलेल्या ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात 38 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. हिंजवडी पोलिसांनी हत्येचा तपास करत शेजाऱ्याला अटक केली.
काय आहे प्रकरण?
पिंपरी चिंचवडत हिंजवडीमधील साखरे वस्ती भागात 3 ऑक्टोबर रोजी संतोष माने या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करुन संतोषची हत्या करण्यात आली होती. पत्नी सरस्वती माने यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हिंजवडी पोलिसांनी खुनाचा उलगडा करत शेजारी राहणाऱ्या 23 वर्षीय कैलास डोंगरे याला अटक केली आहे.
हत्येचा उलगडा कसा झाला?
सुरुवातीला आजूबाजूच्या व्यक्तींकडे चौकशी केली असता नवीन कोणाीच आलं नसल्याचं समजलं. त्यामुळे कोणी आणि का संतोषची हत्या केली, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस तपास करत असताना शेजारी राहणाऱ्या घरासमोर कपडे वाळत घालण्यात आले होते, त्यात केवळ अंतर्वस्त्र ओले असल्याने पोलिसांना शंका आली.
ओल्या अंडरवेअरमुळे पोलिसांना शंका
घरातील सर्व कपडे वाळलेले असताना केवळ एक अंडरवेअर ओली का? या मुलाने इतक्या रात्री आंघोळ का केली असेल? असा प्रश्न सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारणे यांना पडला. त्याचा कसून तपास केला असता आरोपीने खुनाची कबुली दिली.
शेजाऱ्यांच्या भांडणातून हत्या
मयत संतोष माने आणि त्याची पत्नी सरस्वती माने यांचे आरोपी कैलास डोंगरेच्या आई वडिलांबरोबर सातत्याने भांडण होत असे. या कारणावरुन आपण त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
पुण्यात युवा बिल्डरची हत्या
दुसरीकडे, 24 वर्षीय बिल्डरचे अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातील हुडको वसाहतीत काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडा याचे अपहरण करुन हत्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याने शिरुर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बिल्डर आदित्य चोपडा याच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ शिरुर शहरात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत कँडल मार्च मोर्चा काढला होता. या हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करत आरोपींना त्वरीत अटक करावी, तसेच जलदगती न्यायालयात ही केस चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत ‘जस्टीस फॉर आदित्य’च्या घोषणेने परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता.
संबंधित बातम्या :
लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार
वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेणारा कार चालक सापडला, काही तासांतच अटक
पुण्यात पती-पत्नीची हत्या, आर्थिक वादातून धारदार शस्त्राने वार