पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या
गोळीबाराच्या दोन गुन्ह्यात अनिरुद्ध जाधव उर्फ बाळा उर्फ विकी राजू फरार होता, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने कराडमधून अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीच्या सहा गुंडांना जेरबंद करण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने साताऱ्यातून अटक केली आहे. गोळीबाराच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीलाही गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
22 वर्षीय सुरज चंद्रदत्त खपाले, 21 वर्षीय हृतिक उर्फ मुंग्या, 21 वर्षीय रतन रोकडे, 21 वर्षीय सचिन नितीन गायकवाड, 24 वर्षीय अक्षय गोपीनाथ चव्हाण अशी मोक्काच्या गुन्ह्यात अटक केलेल्या रावण टोळीतील आरोपींची नावे आहेत. गोळीबाराच्या दोन गुन्ह्यात अनिरुद्ध जाधव उर्फ बाळा उर्फ विकी राजू फरार होता, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने कराडमधून अटक केली आहे.
टोळीच्या म्होरक्याच्या वाढदिवशी केले होते सेलिब्रेशन
दरम्यान, रावण टोळीच्या प्रमुखाच्या जन्मदिवसानिमित्त शस्त्रासह एकत्र आलेल्या सहा गुन्हेगारांना जून महिन्यातही अटक करण्यात आली होती. रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा मृत्यू झाला आहे. पण आपल्या टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करुन हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला ‘रिप्लाय’ देणार होते.
काय घडलं होतं?
अनिकेत जाधवचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या सहा गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यामध्ये रावण टोळीतील प्रमुख आरोपी आणि मयत अनिकेत जाधव याचा भाऊ अनिरुद्ध ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव हा देखील होता.
टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करुन हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला उत्तर देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाढदिवसाच्या व्हिडिओसारखा आरोपीचा व्हिडीओ तयार करत उत्तर दिलं. अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजू जाधव, धीरज दीपक जयस्वाल, रोहन राजेंद्र कांबळे, अमित भगिरथ मल्लाव, मंगेश देवीदास नाटेकर, अक्षय लहू चौगुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिरुद्धकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळला होता. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली होती.
संबंधित बातम्या :
मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक
पुण्यात तलवारीने केक कापला, बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल
बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन