ढगात आहे आपण, खालनं किती बी दगडं मारा, ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती उतरेना, पिंपरी पोलिसांना व्हिडीओतून चॅलेंज
वाकड पोलिसांनी संबंधित मुलीला 30 जानेवारी रोजी अटक केली होती. तेव्हाचा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट केला आहे. त्यातून तिने पोलिसांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड : ‘थेरगाव क्वीन’ (Thergaon Queen) या इन्स्टाग्राम हँडलमुळे कुप्रसिद्ध झालेली अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यातून सुटली, मात्र तिची मिजास काही कमी झाल्याचं दिसत नाही. कारण पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतरही ती सुतासारखी सरळ झाली नाही, तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच या म्हणीचा प्रत्यय देत आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) मधील “थेरगाव क्वीन” नावाने इंस्टाग्राम अकाऊंट (Instagram Account) चालवणाऱ्या मुलीने अश्लील शिवीगाळ करत व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिला अटक केली होती. मात्र पोलिसांच्या ताब्यातून सुटतात त्या मुलीने पुन्हा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत थेट पिंपरी चिंचवड पोलिसांना आव्हान दिलं आहे.
काय आहे चॅलेंज?
वाकड पोलिसांनी संबंधित मुलीला 30 जानेवारी रोजी अटक केली होती. तेव्हाचा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट केला आहे. त्यातून तिने पोलिसांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मोठी हस्ती आहे आपण, तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालनं किती पण दगडं मारु द्या आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं’… ‘अख्ख्या ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो…’ असं गाणं बॅकग्राऊण्डला वाजताना ऐकू येतं.
गेल्या काही दिवसांपासून तिच्या आक्षेपार्ह संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चिंतेचा विषय ठरत आहेत. शिवीगाळ, भांडणापासून सुरु होणारी थेरगाव क्वीनची जीभ थेट हत्या करण्यापर्यंत पोहोचल्याने तिचे व्हिडीओ चर्चेत आले होते.
मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष द्या!
लॉकडाऊनमध्ये शिक्षण ऑनलाईन झालं, अशा वेळी पालकांनी त्यांच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष द्यावे, असा मौलिक सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्वेताली घोलप यांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या मुलांच्या या वागणुकीवरुन चिंता व्यक्त केली. मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बारीक लक्ष ठेवण्याची गरजही व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
थेरगाव क्वीन’ची थेरं पाहून पालक चिंतेत! थेरगाव क्वीनला फॉलो करणारे ते 70 हजार रिकामटेकडे कोण?