पुणे : ग्राम पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये, या कारणावरुन पतीने आपल्याच पत्नीचा गळा दाबला. पत्नीला मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पतीने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी गावात घडला आहे.
काय आहे प्रकरण?
ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार बाहेर काढत संबंधित महिला आमरण उपोषणाला बसली होती. त्यामुळे तिचा पतीच तिच्या विरोधात उभा राहिला. पतीने आधी तिची दुचाकी दगडाने फोडली. त्यानंतर तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र तोडून चोरुन नेल्याचा प्रकार घडला. शिरुर पोलिसांत या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात महिलेने उपोषणाची हाक दिली होती. त्यासाठी त्या शिरुरमधील पंचायत समितीच्या बाहेर 20 सप्टेंबर रोजी थांबल्या होत्या. यावेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीच्या मागील गेटसमोर लावलेली दुचाकी त्यांच्या पतीने दगडाने फोडून तिचे नुकसान केले. तसेच महिलेच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेला.
मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून चोरुन नेले
फिर्यादी महिलेला शिवीगाळ करुन त्यांचा गळा दाबून झटापट केली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून चोरुन नेले. शिरुर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आंध्र प्रदेशात पतीकडून पत्नीची हत्या
दुसरीकडे, बायकोची हत्या केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) लागण झाल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने नातेवाईकांसमोर रचला. मात्र सीसीटीव्हीमुळे पतीचं पितळ उघडं पडलं. आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता.
आरोपी पती श्रीकांत रेड्डी हा आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील बुद्वेलचा रहिवासी आहे. चित्तूर जिल्ह्यातील रामसमुद्रममध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय भुवनेश्वरीसोबत 2019 मध्ये त्याचा प्रेम विवाह झाला होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच रेड्डी दाम्पत्य तिरुपतीमधी डीबीआर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. त्यांना दीड वर्षांची मुलगीही आहे.
भुवनेश्वरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. हैदराबादमधील एका आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती सध्या घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत होती. मात्र 2020 मध्ये श्रीकांतची नोकरी गेली. त्यानंतरच दोघांमध्ये वाद वाढले होते. वादावादीतून श्रीकांतने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने भुवनेश्वरीचा मृतदेह एका बॅगेतून जंगलात नेला आणि निर्जन जागा पाहून जाळून टाकला.
संबंधित बातम्या :
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या
इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक
पत्नीची हत्या करुन पतीने मृतदेह जंगलात जाळला, Delta Plus संसर्गाने मृत्यू झाल्याचा बनाव