पुणे : पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. या प्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43 वर्ष, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43 वर्ष) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड आणि साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय आणि त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते. त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे, तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवत दंडाची रक्कम न भरता जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातल्याचा आरोप आहे.
मुंबईतही वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटवलं
दुसरीकडे, वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून नेल्याप्रकरणी मुंबईत कार चालकाला अटक करण्यात आली होती. मुंबईत अंधेरीतील डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला होता. गाडी न थांबवल्याने वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर चढला. तरी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच फरफटत पुढे नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
संंबंधित बातम्या :
वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेणारा कार चालक सापडला, काही तासांतच अटक
VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना