पुणे : पुण्यातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेट सुरु असल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला. मागील तीन वर्षांच्या काळात आरोपींनी हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या नावाखाली तब्बल 300 जणांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील विमाननगर भागातील बोगस हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. या ठिकाणी छापा टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
तीन आरोपींना अटक
शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह असं अटक केलल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर संबंधित रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या पंचशीला काशिनाथ रोडगे आणि चैताली भरत म्हस्के अशी अटक कलेल्या महिलांची नावं आहेत.
या प्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
विमाननगर परिसरात क्लिनिक
विमाननगर परिसरातील हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अस्थेटिक स्टुडिओ नावाच्या क्लिनिकमध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. पकडलेल्या तिघांकडील रेकॉर्ड्सची तपासणी केली असता, त्यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक जणांवर हेअर ट्रीटमेंट केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
Bribe | दहा लाखांची मागणी, सात लाखात तडजोड, लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा
स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक
पुण्यात लॉजमध्ये देहव्यापार, मॅनेजरला बेड्या; दहा महिलांना केलं मुक्त