पुण्यात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर विकृत लैंगिक अत्याचार, अमानुष घटनेची महिला आयोगाकडून दखल
पुण्यात अतिशय संतापजनक असा प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीस मारहाण करुन तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले आहेत. आरोपी पतीने पीडितेवर अत्यंत विकृत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीस मारहाण करुन तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले आहेत. आरोपी पतीने पीडितेवर अत्यंत विकृत लैंगिक अत्याचार केले. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या पत्नीसोबत इतकं भयानक कृत्य करुच कसा शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात होती. संबंधित घटनेची दखल राज्य महिला आयोगाकडूनही घेण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.
“पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस मारहाण करून अत्यंत विकृत कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. महिलेवर केलेल्या शारीरिक अत्याचाराचे स्वरूप अतिशय क्रूर आणि संतापजनक आहे. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.राज्य महिला आयोगाने याची दखल घेत तातडीने पीडितेला योग्य ते उपचार देण्याचे तसेच तपास जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना पाठवण्यात आलेल्या पत्राचादेखील फोटो शेअर केला आहे. या पत्रात पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या पत्रात संबंधित प्रकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे.
महिला आयोगाने पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
“महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) आणि (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीस मारहाण करुन तिच्या शरीरावर ब्लेडने वार केले आहेत. तिच्यावर अत्यंत विकृत लैंगिक अत्याचार केल्याबाबतची घटना प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. तरी प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदर प्रकरणाची योग्य ती नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही करावी आणि आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२ (३) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा, ही विनंती”, असं राज्य महिला आयोगाने पत्रात म्हटलं आहे.