लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

| Updated on: Jun 15, 2021 | 7:19 PM

'कानून के हाथ लंबे होते है', अशी हिंदी म्हण आपण ऐकली आहे. या म्हणीचा प्रत्यय अनेकवेळा आपल्याला बघायला मिळाला आहे. आतादेखील तशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे (Mumbai Police arrest robber who broke lockup and fled)

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Follow us on

पुणे (भोर) : ‘कानून के हाथ लंबे होते है’, अशी हिंदी म्हण आपण ऐकली आहे. या म्हणीचा प्रत्यय अनेकवेळा आपल्याला बघायला मिळाला आहे. आतादेखील तशीच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे करणारा आरोपी पुण्याच्या भोर येथील जेलमधून फरार झाला होता. हा आरोपी गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत मोकाट फिरत होता. त्याच्यासोबत आणखी एक आरोपी फरार झाला होता. मात्र, त्याला 15 एप्रिलला पोलिसांनी पकडलं होतं. त्यानंतर पोलीस दुसऱ्याच्या शोधात होते. अखेर दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या आरोपीला मुंबईच्या गोरेगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत (Mumbai Police arrest robber who broke lockup and fled).

पुणे आणि सातारा जिल्ह्यात अनेक मोठमोठे गुन्हे

संबंधित आरोपीचं नाव प्रवीण प्रल्हाद राऊत असं आहे. तो इंदापूर तालुक्यातील चिखली गावाचा रहिवासी आहे. त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्ये 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यात अनेक मोठमोठे गुन्हे करुन दहशत पसरवली आहे. त्याने राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स या दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकला होता. यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात सोने-चांदी लुटून नेले होते (Mumbai Police arrest robber who broke lockup and fled).

आरोपी लॉकअपमधून लॉकअपचा गज कापून पळाला

ज्वेलर्सवरील दरोड्या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्यानंतर पुढील तापासासाठी त्याला राजगड पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. आरोपी प्रवीण राऊतला भोर येथे जेरबंद करण्यात आलं होतं. यादरम्यान तो 17 फेब्रुवारीला भोर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून लॉकअपचा गज कापून पहाटेच्या सुमारास पळून गेला होता. त्याला या कामात आरोपी चंद्रकांत लोखंडे या आरोपीने मदत केली होती. तसेच प्रवीण राऊत याच्यासोबत तोदेखील पळून गेला होता. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी आरोपीला बेड्या कशा ठोकल्या ?

अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने 15 एप्रिलला खेड तालुक्यातील शिवापूर येथून चंद्रकांत लोखंडे याला अटक केली. पण तरीही प्रवीण राऊत हा फरार होता. त्याचाही शोध सुरु होता. अखेर आरोपी प्रवीण हा सोमवारी (14 जून) मुंबईच्या गोरेगाव वेस्ट येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला बेड्या ठोकल्या.

मुंबईच्या गुन्हे शाखेने आरोपी प्रवीण राऊत याला पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं आहे. या गुन्हेगारावर फलटण शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन, वालचंदनगर पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, भिगवण पोलीस स्टेशन, राजगड पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास