पुणे : गुन्हेगारीशी संबंधित सोनी वाहिनीवरील मालिका ‘सीआयडी’ पाहून त्यामधील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे खूर्दमध्ये घडली आहे. शालिनी बबन सोनावणे(70) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर मुलांचे वय 14 व 16 वर्षे आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे कुठलाही पुरावा मागे न सोडण्याचा आटोकाट प्रयत्नही या मुलांनी केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याची उकल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
शालिनी या 30 ऑक्टोबर रोजी दुपारी हिंगणे खुर्द येथील सायली हाईट्समधील आपल्या राहत्या घरी टीव्ही पाहत बसल्या होत्या. मयत महिलेच्या घरालगतच ही अल्पवयीन मुले राहत होती. त्यामुळे त्यांचे महिलेच्या घरी कायम येणे जाणे असायचे. महिलेकडे पैसे असून ते पैसे कोठे ठेवतात, याबाबत त्यांना माहिती होती. यासाठी या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी सीआयडी मालिका पाहून चोरीचा कट रचून महिलेच्या घराची चावी चोरली होती. परंतु संबंधित महिला वयस्कर असल्याने घर सोडून कोठही जात नसल्याने त्यांना चोरी करता आली नाही. मात्र, 30 तारखेला महिला घरात एकटी असताना त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी महिला टीव्ही पाहत होती. महिलेसोबत या दोघांनीही टीव्ही पाहण्याचा बनाव केला. काही वेळात महिलेला पाठीमागून धक्का देत खाली पाडले. यानंतर महिलेचे तोंड व नाक दाबून खून केला व घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते. घटनास्थळी बोटांचे ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हँडग्लोज घातले होते.
घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, कुणीही प्रत्यक्षदर्शी नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या दृषिटीकोनातून पोलिसांनी तपास सुरु केला. याच दरम्यान मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार उज्जव मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिर येथील लहान मुलांकडून महत्वाची माहिती मिळाली. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने परत घरी आले होते. यावरून पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये दोन मुले अत्यंत घाई गडबडीत निघून जात असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी दोन्ही मुलांनी चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता यातील एका मुलाला स्वःतच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (Murder of an elderly woman by minors in Pune)