पुणे पोर्शे अपघातानंतर वडील आणि आजोबांनंतर आता आई पोलिसांच्या रडारवर
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवीन नवीन माहिती तपासात समोर येते आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कसा प्रकारे पैशाचा दबाव आणला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आता तपासात उघड झाले आहे. संपूर्ण कुटुंब आता तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शेच्या धडकेत दोन जण (मुलगा आणि मुलगी) ठार झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ससून सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 19 मे रोजी या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले होते. अल्पवयीन मुलाच्या जागी त्यांनी त्याची आई आणि त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या इतर दोन लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. ही धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाची आई शिवानीचे रक्ताचे नमुने देखील घेणार आहे. याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर या प्रकरणात आता मुलाच्या आईवरही कारवाई केली जाणार आहे.
ससूनच्या डॉक्टरांना ३ लाखांची लाच
अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन आरोपीला १९ मे रोजी अपघातानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या दरम्यान मुलाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना पैशाचे आमिष दाखवले. श्रीहरी नावाच्या व्यक्तीने मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला. परंतु त्यात अल्कोहोल असू शकते हे लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३ लाख रुपये घेण्यात आले. रजेवर असताना देखील डॉ.अजय तावरे याने यात हस्तक्षेप केला. दोन मुलांच्या ऐवजी इतर रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी अल्पवयीन रुग्णाच्या रक्ताचा नमुना डीएनए चाचणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. तपास केला असता रक्ताचे नमुने बदलल्याची बाब समोर आली.
शिवानी अग्रवाल हिचा नमुना मुलाच्या ऐवजी घेतला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात शिवानी अग्रवाल हिने डॉक्टरांना धमकावल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणात आता आरोपी वडील आणि आजोबांनंतर आई देखील पोलिसांच्या रडारवर आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालची अटकही निश्चित झाली आहे.
पुणे पोर्शे दुघटनेत २ पोलीस निलंबित
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक केलीये. ज्यामध्ये आरोपीचे आजोबा, वडील आणि दोन डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये पब मालक, दोन व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी यांचाही समावेश आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ससून रुग्णालयाच्या डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आता अल्पवयीन मुलाच्या आईची चौकशी सुरू आहे.
कारने 2 जणांना चिरडले
पुण्यात 18 आणि 19 मे च्या मध्यरात्री एका अल्पवयीन व्यक्तीने दोन दुचाकीस्वारांना त्याच्या वेगवान पोर्शे कारने धडक दिली होती. ज्यामध्ये दुचाकीवर असलेल्या दोन्ही आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी आरोपी दारूच्या नशेत होता. त्याच्या कारचा वेग ताशी 200 किलोमीटर होता. घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण मुलाच्या कुटुंबियांनी पैशाच्या जोरावर हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अवघ्या 15 तासात मुलाला जामीन मिळाला होता. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांकडून हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आता गुन्हे शाखा या प्रकरणात पुढील तपास करत आहे.