पिंपरी चिंचवड : धूम स्टाईलने सुसाट यायचं, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीवर हात टाकायचा आणि दागिने चोरून पळून जायचं, असे प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये वाढले होते. पण या वाढत्या प्रकारांची गंभीर दखल घेत पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आकाश राठोड आणि सोमपाल सिंह अशी अटक करण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांची नावं आहेत. त्यांच्याकडून तब्बल एक कोटीपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.
आकाश आणि सोमपाल हे दुचाकीवरुन धूम स्टाईलने यायचे. सुसाट वेगात येऊन महिलांच्या गळ्यात दागिन्यांवर हात मारायचे आणि सुसाट वेगात पळ काढून नाहीसे व्हायचे. या सराईत सोनसाखळी चोरांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये दहशत पसरली होती. अखेर या दोघानांही पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश आणि सोमपालची पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, त्या दोघांनी तब्बल 16 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केलेत. या प्रकरणी आता अधिक तपास केला जातोय. जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने मंगळसूत्र असून काही सोन्याच्या चैनचाही समावेश आहे.
आकाश आणि सोपमालच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरांचं धाबं दणाणलं आहे. पोलिसांनी सोनसाखळी चोरांविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसंच महिलांनीही सामसूम असलेल्या परिसरात शक्यतो मौल्यवान दागदागिने घालून जाणं टाळावं, असंही आवाहन केलं जातंय.
सकाळच्या वेळेस, रात्री उशिरा किंवा शक्यता रहदारी नसेल, अशी वेळ साधून सोनसाखळी चोर महिलांना एकट्यात गाठून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरत असल्याच्या अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय.