पुण्याचा उच्चशिक्षित इंजिनियर बाईक मॉडिफाय करता-करता असा ‘चोर’ झाला
पुण्यात एका उच्चशिक्षित तरुणाने केलेल्या कुकृत्याचा पर्दाफाश अखेर पोलिसांनी केला आहे. आरोपी हा पेशाने मॅकेनिकल इंजिनियर आहे. पण त्याने आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा वापर अतिशय चुकीच्या गोष्टींसाठी केला. त्यामुळे त्याला आता जेलची हवा खावी लागत आहे.
पुणे | 8 ऑगस्ट 2023 : शिक्षण आपल्याला समृद्ध करतं असं आपण मानतो. शिक्षणामुळे आपल्या ज्ञानात भर होते. दोन चांगल्या गोष्टी समजतात. आपल्याला चांगल्या-वाईटची पारख होते, असं आपण मानतो. पण काही जण त्याला अपवाद असतात. त्यांच्यावर शिक्षणाचा काही चांगला परिणामच होत नाही. याउलट ते शिक्षणाचा उपयोग नकारात्मक गोष्टींसाठी करतात. पिंपरी-चिंचवडमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. एक उच्च शिक्षित इंजिनियर तरुणाने आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला नाही तर चुकीच्या गोष्टींसाठी केला. त्यामुळे तो आता पोलिसांच्या जाळ्यात चांगलाच अडकला आहे. त्याचे कारनामे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्याच्या वाईट कृत्याचा त्याला चांगलाच परिणाम भोगावा लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिंपरी-चिंचवडच्या क्राईम ब्रँच युनिट चारने दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. टोळीचा म्होरक्या अक्षय हा उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. तो इंजिनियर असून त्याने मॅकेनिकल डिप्लोमाचं शिक्षण घेतलेलं आहे. पण त्याने आपलं ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग चुकीच्या गोष्टींमध्ये केला. त्यामुळे तो आता लॉकअपमध्ये जायबंद झालाय. पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांकडून आतापर्यंत 11 लाख 80 हजारांच्या तब्बल 13 दुचाकी आणि दोन दुचाकींचे इंजन जप्त केले आहे.विशेष म्हणजे या कारवाईत आठ गुन्ह्यांची उकल झालीय. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.
आरोपी इंजिनियरचं नाव हे अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे असं आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपी दुचाकी कसे चोरायचे, मग काय-काय करायचे, तसेच वाहनांचं भंगार कुणाला विकायचे? याबाबतची सविस्तर माहिती मिळवली आहे. तसेच पोलिसांनी दुचाकींचं भंगार विकत घेणाऱ्या समशेर इस्माईल सहा या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपींकडून चोरीच्या गाडींचे भंगार विकत घ्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपी दुचाकी मॉडीफाय करुन विकायचा
मॅकेनिकल डिप्लोमा केलेला अक्षय हुलावळे हा अल्पवयीन साथीदारासह शहरातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या आर.एक्स.हंड्रेडसह इतर दुचाकी चोरायचा. तो त्या गाड्या मॉडीफाय करून अधिक किंमतीला विकत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तसेच काही दुचाकींची स्पेअर पार्ट आणि इंजिन विकत असे.
दरम्यान, चोरी केलेली वाहन अक्षय हुलावळे हा शेतातील गोठ्यात लपून ठेवायचा. तसेच गाडी ओळखायला येऊ नये म्हणून नंबर प्लेट देखील बदलत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपींकडून 11 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आठ गुन्हे देखील उघड केले आहेत.
संबंधित कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नारायण जाधव, तुषार शेटे, प्रशांत सैद, प्रवीण दळे, सुखदेव गावंडे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, मोहम्मद गौस रफिक नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाय, संजय गवारे, दादा पवार, आबासाहेब गिरणारे, मिसाळ, रोहिदास आडे यांच्या टीमने केली आहे.