Lalit Patil | ललित पाटील याची प्रेयसी आरोपी… पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड
Pune Lalit Patil | पुणे शहरातील ससून रुग्णालयातून सुरु झालेले ललित पाटील ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर आले आहे. मुंबई पोलिसांनी सकाळी नाशिकमध्ये जाऊन कोट्यवधी रुपयांचा ड्रग्स जप्त केला. आता ललित पाटील याच्या प्रेयसीला आरोपी केलेय.
पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ललित पाटील प्रकरणात पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री नाशिकमधील ग्रामीण भागात ऑपरेशन राबवले. मुंबई पोलिसांनी गिरणा नदीपात्रात टाकलेले कोट्यवधींचे ड्रग्स मध्यरात्री शोधून काढले. त्यानंतर आता ललित पाटील याच्या प्रेयसीसंदर्भात धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला आरोपी केले आहे. यापूर्वी तिच्यावर ललित पाटील याला पळून जाण्यास मदत करण्यासंबंधीचे कलम लावण्यात आले होते. परंतु आता तिला आरोपी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून पुणे पोलीस ललित पाटील याचा ताबा मागणार आहे.
कोण आहे ती प्रेयसी
ललित पाटील याच्यामुळे चर्चेत आलेली वकील असलेली प्रज्ञा कांबळे हिला आता आरोपी करण्यात आले आहे. प्रज्ञा कांबळे हिने बेकायदेशीर अमली पदार्थ विक्रीत पैशाचा विनियोग केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तसेच या गुन्ह्यासंदर्भात सर्व माहिती तिने लपवली. यामुळे तिच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तिला आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी तिच्यावर आरोपी ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे कलम लावले होते. प्रज्ञा कांबळे हिला एनडीपीएस कायद्यानुसार आरोपी केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
नाशिक पोलिसांनी केली होती अटक
ललित पाटील याची प्रेयसी असलेल्या प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. ललित याला पळून जाण्यात त्या दोघांनी मदत केली होती. ललित पाटील याने त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. सोमवारी या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तसेच भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याची रवानगी कारागृहात करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १५ झाली आहे.
ललित पाटील याला पुणे पोलीस ताब्यात घेणार
ललित पाटील सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलिसांची चौकशी संपल्यानंतर पुणे पोलीस त्याचा ताबा मागणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात पोलिसांसमोरच ललित पाटील फरार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पंधरा दिवसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली होती. तेव्हापासून तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.