पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. त्यानंतर राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. समितीने या प्रकरणीची चौकशी सुरु केली असताना पुणे पोलिसांनी मोठा बदल केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. तसेच तपास अधिकारी बदलला आहे. यामुळे एकाच वेळी सर्वच पातळीवर कारवाई सुरु झाली आहे.
ललित पाटील प्रकरणात राज्य शासन, ससून प्रशासनाकडून पावले उचलली गेल्यानंतर आता पोलिसांनीही मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे तपास करणार आहेत. यापूर्वी हा तपास गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांच्याकडे होता. परंतु सुनील तांबे यांचा गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रकरण देण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई केली जात आहे. नाशिकमध्ये भूषण पाटील याचे सहकारी असलेले शिवाजी शिंदे आणि रोहितकुमार चौधरी या दोघांना अटक केली आहे. भूषण पाटील याचे मित्र आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये कायमस्वरूपी तळ ठोकून आहे.
पुणे पोलिसांकडून ललित पाटील याचा शोध सुरु आहे. ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना मिळाला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.