पुणे : ताईला शाळेतून आणण्यासाठी सात वर्षांची चिमुरडी पप्पांसोबत बाईकवरुन निघाली. पण वाटेतच या मुलीवर काळानं घाला घातला. भरधाव एसयूव्हीने (SUV) बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत सात वर्षांची चिमुरडी दूरवर फेकली गेली. डोक्यावर आदळल्यानं तिला गंभीर जखम झाली. पायालाही मार बसला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वडील जखमी झाले. पुणे (Pune Accident News) जिल्ह्यातील खराडी इथं शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता हा थरारक अपघात घडला. पोलिसांनी (Pune Crime News) या अपघाताची नोंद करुन घेतलीय. भरधाव एसयू्व्हीच्या चालकाला पोलिसांनी अटकही केलीय.
अटक करण्यात आलेल्या कार चालकाचं नाव अमित कुमार संजय प्रधान (41) असं आहे. तर अपघातात मृत्यू झालेल्या सात वर्षांच्या चिमुरडीचं नाव रिया पवार असं आहे. रिया पवार ही इयत्ता दुसरीत शिकत होती. तिच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.
या अपघातप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पवार (39), हे आपल्या मोठ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. बाईकवरुन जात असताना त्यांनी आपल्या धाकट्या मुलीलाही सोबत घेतलं होतं. सात वर्षांची रिया पप्पांच्या मागे बाईकवर बसली होती. पण खराडी येथील शितलादेवी मंदिर चौकात उमेश पवार यांच्या बाईकला एका एसयूव्ही कारचं बोनेट डाव्या बाजूने जोरात धडकलं.
ही धडक इतकी भीषण होती ही बाईकवर मागे बसलेली सात वर्षांची रिया हवेतच फेकली गेली. त्यानंतर ती जमिनीवर आदळली आणि तिला गंभीर मार बसला. तर रियाचे वडील उमेश पवार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांनाही जखम झाली. पण रियाला झालेली जखम इतकी जबर होती, की तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार बसला होता.
रियाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालक प्रधान यांनीच तिला रुग्णालयात आणलं होतं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना हॉस्पिटलमधूनच मिळाली होती. कार चालक हा एक आयटी इंजिनिअर असून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो, अशीही माहिती पोलिसांनी दिलीय..
मृत चिमुरडीचे वडील उमेश पवार यांनी माध्यमांशी बोलताना या अपघाताबाबत अधिक माहिती दिली. एका चौकात ते बाईकवर थांबले होते. इतर गाड्या पास होण्यासाठी त्यांनी बाईक थांबवली होती. पण तितक्यात एक भरधाव एसयूव्ही आली आणि तिने बाईकच्या उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर रस्त्यावर फेकली केलेली रिया पप्पा पप्पा म्हणून ओरडली. ती रस्त्यावर आदळली गेल्यानंतर वेदनेनं विव्हळत होती. जवळपास अर्धात तास ती माझ्याशी बोलत होतं. तिनं माझीही विचारपूस केली. तिला पोटात असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्नही केला. पण त्यांना यश मिळू शकलं नाही, असंही उमेश पवार यांनी म्हटलंय.