पुणे अपघात प्रकरणात चालकाला डांबून ठेवणाऱ्या बड्या व्यक्तीला अटक
pune porsche accident: अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात यापूर्वीच अटक झाली होती. आता विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातानंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर चौफेर टीका झाली. त्या टीकेनंतर पुणे पोलीस खळबळून जागे झाले आहे. पुणे पोलिसांनी अनेक पातळ्यांवर तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. तसेच माहिती वरिष्ठांना न दिल्यामुळे दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अग्रवाल कुटुंबियाविरोधात तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी सातवी अटक केली आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर हे आहोत आरोप
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात यापूर्वीच अटक झाली होती. आता विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात ही सातवी अटक आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहे. कलम 365 आणि 368 कलम लावले आहे. त्यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
चालकाला विशाल अग्रवालकडून पैशांची ऑफर
अपघात घडला तेव्हा पोर्श गाडी आपण चालवत होतो, असा जबाब पोलिसांना देण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी चालकाला पैशांची ऑफर दिली होती. परंतु विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल त्यापुढे गेले. त्यांनी हवा तसा जबाब देण्यासाठी चालकाला डांबून ठेवले.
चालकाला बंगला देण्याचे आमीष
अपघात झाल्यानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता. कारण अपघातानंतर सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले होते. बंगला देतो असे अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवले होते. त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. चालकाच्या पत्नीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहेत सुरेंद्र अग्रवाल
सुरेंद्र अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर २००९ ला बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास सीबीआय करत आहे. २००९ ला झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे उघड झाले होते. पुण्यातील शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्यावर गोळीबार प्रकरणातील सहआरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आहेत.
ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला धमकावणे, डांबून ठेवणे, मोबाईल काढून घेणे असे प्रकार केला. या प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल याला अटक केलीय.