पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी ऑनलाईन फसवणुकीच्या आहेत. परंतु आता दाखल झालेली तक्रार मैत्रीमधील फसवणुकीची आहे. एका बालपणीच्या मित्रांकडून दुसऱ्या मित्राची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. ही फसवणूक तब्बल एक कोटी पेक्षा जास्त रुपयांची आहे. यामुळे मैत्रीच्या नात्याला धक्का बसला आहे. अखेर या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे येथील घोरपडीमध्ये हॉटेल डायमंड क्वीनचे मालक मुख्तार हुसेन मोहम्मद (४४) राहतात. त्यांचा बालपणीचा मित्र अब्दुल हुसैन नैमबाडी उर्फ नादीर आहे. नादीर याचा बेकरीचा व्यवसाय आहे. तसेच शोयेब मैनुद्दीन आत्तर (रा.बोपोडी ,पुणे ) आणि इम्रान लतिफ खान (रा.कोंढवा ,पुणे) हे ही मुख्तार हुसेन यांचे मित्र आहेत. तिघं मित्रांनी मुख्यार यांना एका गृहप्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यातील स्टीलसाठी 44 लाख 50 हजार रुपये लागत आहे. हे पैसे तुम्ही दिल्यास आठ दिवसांत तुम्हाला दहा कोटी रुपये परत करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुन्हा जमिनीच्या खरेदीवरुन त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला. 6 सप्टेंबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला.
मुख्तार यांनी ठरविक कालावधीनंतर पैशांची मागणी केली. परंतु मित्र असलेल्या आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच गंभीर परिणामांची धमकी दिली. आमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे. त्यांच्यामार्फत तुला ठार मारले जाईल, अशी धमकी दिली. या सर्व प्रकरणात मुख्तार यांची एक कोटी सहा लाख रुपयांत फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
मुख्तार यांच्याकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघ आरोपींवर भारतीय दंड विधान ३२८, ४२०, ४०६, १२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पुणे लष्कर पोलीस करत आहेत.