पुण्यातील खुनाचे रहस्य उलगडले, मोबाईल हॉटस्पॉट ठरले कारण…कोयत्याने हल्ला
Pune Crime News: वासुदेव कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने झालेल्या वारामुळे ते रक्तबंबाळ झाले होते. एका व्यक्तीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Pune murder case : पुणे शहरात वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर आणखी एक खून झाला होता. पुण्यातील हडपसरमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली होती. रविवारी रात्री ते शतपावलीसाठी ते निघाले असताना चौघांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यातील तीन जण अल्पवयीन आहे. चौथा आरोपी मयूर भोसले (वय २०) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मोबाईल हॉटस्पॉटसाठी त्यांची हत्या केली.
अशी केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी (वय ४७) हडपसरमध्ये राहतात. ते एका फायनान्स कंपनीत व्यवस्थापक आहेत. रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास जेवण झाल्यावर ते शतपावली करण्यासाठी निघाले. हडपसरमधील उत्कर्षनगर भागात अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे मोबाईलमधील हॉटस्पॉट देण्याची मागणी केली. परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. हे तिघे दारु प्यायले होते. त्यांनी थेट कोयता काढत वासुदेव कुलकर्णी यांच्यावर वार केले. त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाले.
वासुदेव कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने झालेल्या वारामुळे ते रक्तबंबाळ झाले होते. एका व्यक्तीने ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. ते बंटर स्कूल परिसरात राहतात. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह एकाला अटक केली. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच कुलकर्णी यांनी हॉटस्पॉट दिला नाही, यामुळे त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगितले. आरोपी आणि कुलकर्णी यांचा काहीच संबंध नाही.