पुणे | 19 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील मुळशी भागात धक्कादायक घटना घडली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेला हर्षद चंद्रशेखर पिंगळे हा नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. परंतु पुन्हा परत आला नाही. त्याच्यासंदर्भात नेमके काय घडले? यावर आता पोलीस तपास करणार आहे. या प्रकरणी हर्षद पिंगळे यांच्या भाऊ राजस पिंगळे याने पोलिसात तक्रार दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या युवक, युवतींची जीवनशैली आणि कामाचा ताणतणाव हा विषय यानिमित्ताने चर्चेत येणार आहे.
आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय ३९) या तरुणाचा सकाळी जॉगिंग करताना मृत्यू झाला. हर्षद पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथील स्काय मानस तलाव येथे राहत होता. तो नियमित सकाळी भूगाव ते चांदणी चौक असा धावण्याचा सराव करत होता. भूगाव येथे पोहोचल्यावर त्याला अचानक चक्कर आले आणि तो खाली कोसळला. एक टेम्पो चालक त्वरित त्याच्या मदतीसाठी धावला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हर्षदचा भाऊ राजस चंद्रशेखर पिंगळे (वय ३४) याने या प्रकाराची तक्रार पोलिसात नोंदवली आहे. हर्षदचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलीस करणार आहे. परंतु आयटी क्षेत्रातील कामाचा तणाव आणि त्या तरुण, तरुणींची जीवनशैली यावर यानिमित्ताने चर्चा होणार आहे. यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात, काय सूचना करता, हे ही येत्या काळात स्पष्ट होणार आहे.