योगेश बोरसे, पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यात (Pune Crime) मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना घडत आहे. परंतु आता उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या मसाज सेंटर सुरु झाले आहे. या मसाज सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसायाचा (Prostitution) केला जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे सांस्कृतिक पुण्यात हे काय सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात यापूर्वी मसाज सेंटरवर छापे टाकले गेले. त्या छाप्यात वेश्याव्यवसायचा प्रकार उघड झाला. आता पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मसाज सेंटरसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार समोर आला. हवेली पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एकाला अटक केली आहे.
मसाज सेंटर चालवणारा शैलेश सर्जेराव देडे याला पोलिसांनी अटक केली आहे. देडे याने सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ स्पर्श मसाज सेंटर सुरु केले होते. त्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरु केला. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना मसाज सेंटरमध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत. या प्रकरणी देडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटर किंवा मसाज सेंटर नावाचा फंडा होता. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. आता पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही स्पा सेंटर किंवा मसाज सेंटरचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले दिसतात. या ठिकाणी स्वीडिश, डिप टिश्यू आणि ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून आता ग्राहकांना शोधून वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. पुणे शहरात काही मसाज सेंटर निवासी संकुलातही थाटले गेले आहे. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.