कोट्यवधींचे ड्रग्स पाहून पोलीस अधिकाऱ्याचे डोळे फिरले, ड्रग्स विक्रीसाठी नामचीन गुन्हेगाराशी संपर्क, पुढे असे घडली की…
Pune Crime News | ड्रग्सच्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचा प्रयत्न फौजदाराच्या चांगलाच अंगलट आला. परंतु कोट्यधीश होण्याऐवजी जेलची हवा त्याला खावी लागली. या प्रकरणी त्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे | दि. 4 मार्च 2024 : झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण शार्टकट मार्ग वापरतात. परंतु हा शार्टकट मार्ग चांगलाच महाग पडतो. ज्याच्याकडे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्या अधिकाऱ्याने श्रीमंत होण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबला. पोलीस अधिकाऱ्याने चक्क सापडलेले ड्रग्स विक्रीचा प्रताप करण्याचा प्रयत्न केला. मेफेड्रोन नावाच्या या ड्रग्सच्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यासाठी नामचीन गुन्हेगाराशी संपर्क केला. पण पुढे वेगळेच घडले. कोट्यधीश होण्याऐवजी जेलची हवा खावी लागली. पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्याकडून सुमारे ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकार
पिंपरी- चिंचवड पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत आहे. त्याची नेमणूक- निगडी पोलिस ठाणे येथे करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने नाकाबंदीत मिळालेले ड्रग्ज परस्पर विक्रीचा प्रयत्न केला. त्यामध्यमातून कोट्यधीश होण्याचा प्रयत्न होता. एका गाडीतून ड्रग्स २६ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर पोते पडले. त्या रस्त्यावरुन जाताना कारचालक ईश्वर मोटे यांनी ते पोते दिसले. त्यांनी ते उघडून पाहिले असता काळसर रंगाचा पदार्थ दिसला. त्यांनी हे एखाद्या कंपनीचा कच्चामाल असले असे समजून ते नाकाबंदीतील पोलिस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे दिले. सुधीर ढवळे हा विकास शेळके याचा रायटर होता. त्याने ही माहिती शेळके याला दिली.
शेळकेला पडले कोट्यधीश होण्याचे स्वप्न
विकास शेळके याने हे पोते लपवून ठेवण्याचे सांगितले.आपण हे ड्रग्स विकून कोट्याधीश होऊ, असे स्वप्न त्याने पाहिले. यामुळे ढवळे याला या प्रकाराची वाच्यता न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, ढवळे आणि चव्हाण यांनी पोते लपवून ठेवले.
ड्रग्स विक्रीचा प्लॅन
पंचेचाळीस कोटी रूपये किंमत असलेले मेफेड्रोन ड्रग्स विकून फौजदार विकास शेळके याला कोट्याधीश होण्याचे वेध लागले. त्याने मेफेड्रोन विकण्यासाठी रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगारास संपर्क करण्यासाठी नमामी झा याला पाठवले. परंतु त्या गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली. मग त्याने हा प्रकार वरिष्ठांना सांगितला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सापळा रचून नमामी झा याला अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याने विकास शेळके याचा प्रताप समोर आणला. या प्रकरणात फौजदार विकास शेळके आणि नमामी शंकर झा यांना अटक करण्यात आली आहे.
विकास शेळके हॉटेलमध्ये पार्टनर
आरोपी विकास शेळके याने झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी नोकरी करताना एका हॉटेलमध्ये पार्टनर देखील झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्या ठिकाणीच नमामी शंकर झा कामाला होता.