पुणे : पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. DRDO (Defence Research and Development Organisation) म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना पुणे विशेष कोर्टाने सहा दिवसांची ATS कोठडी सुनावली आहे. प्रदीप कुरुलकर यांना आता 15 मे पर्यंत ATSच्या कोठडीत राहावं लागणार आहे. संबंधित प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे. प्रदीप कुरुलकर हे मोहात वाहत गेले आणि हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले, असा दावा केला जातोय. तपास यंत्रणांचा तपासही तेच सांगताना दिसतोय. सध्या न्यायालयाने त्यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे.
दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS चे अधिकारी प्रदीप करुलकर यांना पुणे सत्र न्यायालयात घेऊन आले. न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने प्रदीप कुरुलकर यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. प्रदीप कुरुलकर यांच्यावर गंभीर आरोप आहेत. कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. प्रदीप कुरुलकर यांनी देशाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती हनी ट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
“सदर व्यक्तीने शासकीय पासपोर्ट वापरून परदेशवारी केली. ते नेमकं कशासाठी परदेशात गेले होते हे पाहणं महत्वाचं आहे. डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना ते भेटले. पण त्याचं रेकॉर्ड गहाळ करण्यात आलं असल्याचा संशय आहे. या व्यक्तीची 7 दिवसांच्या कस्टडीची मागणी आम्ही करत आहोत”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
जो डाटा मिळाला आहे त्याचा योग्य तपास झाला पाहिजे. काही फोटो आणि डाटा दुसऱ्या देशासोबत शेअर करण्यात आला आहे. हे सगळं प्रकरण संवेदनशील आहे. जर काही हालचाली संशयास्पद असतील, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतील तर दुर्लक्ष करता येणार नाही. या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणी 15 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात येत आहे, असं न्यायालयाने जजमेंटमध्ये म्हटलं आहे.
प्रदीप कुरुलकर यांचे वकील ऋषीकेश गानू यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आमचा योग्य युक्तिवाद झालाय. आम्ही सुरुवातीपासून तपासात सहकार्य करत आलो आहोत. पासपोर्टवर माझे क्लाएंट परदेशात गेलेल्या सगळ्या एंट्री आहेत. न्यायालयाने ते चेक कराव्यात. माझ्या क्लाईंटला १५ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया वकील ऋषीकेश गानू यांनी दिली.