पुण्याचे व्यावसायिक आनंद उनवणे हत्या प्रकरण, 27 लाखांसह पसार झालेले आरोपीचे वडील सापडले
तीन फेब्रुवारी रोजी व्यावसायिक आनंद उनवणे यांचे आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्यांचा चार फेब्रुवारी रोजी खून केला. आनंद उनवणे यांचा मृतदेह पाच फेब्रुवारी रोजी महाड परिसरात आढळला होता
पिंपरी चिंचवड : पुण्यातील व्यावसायिक आनंद उनवणे अपहरण आणि हत्या प्रकरणातील (Anand Unawane Kidnap and Murder Case) आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. लाखोंची मालमत्ता घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उनवणेंच्या खून प्रकरणातील आठव्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पिंपरीमधील एफएफआय चिटफंड कंपनीचे मालक आनंद साहेबराव उनवणे यांचे तीन फेब्रुवारी 2021 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे चार फेब्रुवारी रोजी उनवणे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
आरोपीचे वडील दागिने-रोकड घेऊन फरार
आनंद उनवणे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी उमेश मोरे याचे वडील लाखोंची मालमत्ता घेऊन पसार झाले होते. त्यांना बंगळुरु शहरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम, असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुधीर मारुती मोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सात जणांना आधीच अटक
यापूर्वी पोलिसांनी बाबू उर्फ तुळशीराम पोकळे, उमेश सुधीर मोरे, सागर दत्तात्रय पतंगे, दीपक धरमसिंग चंडालिया, राकेश राजकुमार हेमनानी, कपिल ज्ञानचंद हासवानी, प्रवीण नवनाथ सोनवणे या सात जणांना अटक केली होती.
नेमकं काय घडलं होतं
तीन फेब्रुवारी रोजी व्यावसायिक आनंद उनवणे यांचे आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्यांचा चार फेब्रुवारी रोजी खून केला. आनंद उनवणे यांचा मृतदेह पाच फेब्रुवारी रोजी महाड परिसरात आढळला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संबंधित बातम्या :
जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या, इंदापूर हादरलं
भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं
(Pune Crime Pimpri Chinchwad Businessman Anand Unawane Kidnap Murder 8th Accuse Arrest)