विनय जगताप, भोर, पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील फसवणुकीचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करून, खोटे आयकार्ड दाखवून हातचलाखी करत एका वृद्ध व्यक्तीला लुटले. दादासाहेब कृष्णाराव शिंदे असे फसवणूक झालेल्या जेष्ठ व्यक्तीचे नाव आहे. गेल्या महिन्याभरात राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फसवणूक झाल्याची ही तिसरी घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
दादासाहेब कृष्णाराव शिंदे (वय ६५) हे मुंबई येथून सासरी वरवे खुर्द आले होते. त्यांच्या सासर्याचा वर्ष श्रद्ध होते. पुणे, सातारा महामार्गावरुन प्रवास करताना ते सर्व्हिस रोडवर आले. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना थांबवला. मी पोलीस आहे, केव्हापासून तुम्हाला आवाज देत आहे, तुम्ही थांबले का नाही? तुमच्या सुरक्षेसाठीच मी थांबलो आहे. या भागात लुटीचे अनेक प्रकार सुरु आहेत.
दोघांमधील हा संवाद सुरु असताना समोरून दुसरा व्यक्ती आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. त्याला स्वत:ला पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीने थांबवले. गळ्यातील सोन्याची साखळी काढ, मी तुला कागदात गुंडाळून परत देतो, असे म्हणाला. त्यावर त्या व्यक्तीने नकार दिला. त्यामुळे त्या पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या कानशिलात मारली. तुला कळत नाही का? दे ती साखळी म्हणत त्याची साखळी घेऊन कागदात गुंडाळली.
पोलीस म्हणवणाऱ्या तो शिंदे यांना म्हणाला. बाबा तुमची साखळी आणि अंगठी द्या, मी कागदात बांधून देतो. त्यानंतर त्याने ती साखळी अन् अंगठी कागदात बांधून दिली अन् खिशात ठेवण्यास सांगितले. मग दुचाकीवर असलेल्या त्या व्यक्तीला तुला पोलीस स्थानकात नेतो, असे सांगत त्याला घेऊन निघून गेला. त्यानंतर शिंदे यांनी कागद उघडून पाहिले असता, कागदात दागिन्यांऐवजी दगड होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.