Pune Double Murder : दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! चक्क नगरसेवकाच्या घरासमोरच हत्येचा थरार
मध्यरात्री 3 वाजताची वेळ, तलवार आणि पालघन घेऊन ते तयारीनिशीच आले आणि...
पुणे : पुण्यात (Pune crime News) दिवसेंदिवस हत्येच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढली आहे. आता तर दुहेरी हत्याकांड (Pune Double Murder) घडल्यामुळे एकच खळबळ माजलीय. धारदार शस्त्रांनी वार करत दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे एका नगरसेवकाच्या घरासमोरच हत्येचा थरार घडला. या हत्याकांड प्रकरणी येरवडा (Yerawada Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातोय.
पुण्यातील पांडू लमाण वस्ती इथं मध्यरात्री 3 वाजता दुहेरी हत्याकांडाची ही घटना घडली. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत. चक्क तलवार आणि पालघन सारख्या धारदार हत्याकांना दोघांवर वार करत त्यांचा खून करण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. येरवडा पोलिस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहे. या दोन्ही हत्यांमागे मूळ कारणं नेमकं काय आहे, याचा छडा लावण्याचं आणि मारेकऱ्यांना अटक करण्याचं आव्हान सध्या पोलिसांकडून केलं जातं आहे. येरवडा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली या हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातोय.
अनिल आणि सुभाष यांच्यावर धारदार शस्त्राने नेमका कुणी वार केला? या हत्येमागचा हेतू काय होता? मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडाचा कट कुणी रचला होता? या सगळ्या प्रश्नांची आता पोलिसांच्या तपासाअंती समोर येतील. अद्याप या दुहेरी हत्याकांडप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या दुहेरी हत्याकांडानंतर पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातही हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचीही हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी 48 तासांच्या आतच पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं. आता दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा उलगडा केव्हा होतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.