पुण्यातील ड्रग्स रॅकेटचं कनेक्शन इंग्लडपर्यंत व्हाया पंजाब
pune drug racket | पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक झाली होती. त्याचा नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना होता. त्यानंतर आता पुणे शहरात कुरकुंभ येथे ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे. त्याचे धागेदोरे इंग्लंडपर्यंत आहे.
अभिजित पोते, पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरातील कुरकुंभ भागात ड्रग्स रॅकेटचा कारखाना सापडला. या प्रकरणात गेल्या दोन, दिवसांपासून एकामागे एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांना मिळाले आहे. पुणे येथील १४०० कोटी रुपयांचे तर दिल्लीतून १९०० कोटी रुपयांचे ड्रग्स मिळाले आहे. सांगलीमधील कुपवाड येथे ३०० कोटी रुपयांचे ड्रग्स मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. परंतु या सर्व प्रकरणाचा सूत्रधार इंग्लंडमधील आहे.
पंजाबमधून इंग्लंडला जात होते ड्रग्स
पुणे ड्रग्स प्रकरणात वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०), अजय करोसिया (वय ३५), हैदर नूर शेख (वय ४०), भीमाजी साबळे (वय ४६), दिवेश भुटिया (वय ३९), राजपाल कुमार (वय ४२) संदीप यादव यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्स रॅकेटचे आंतराष्ट्रीय कनेक्शन पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. हा ड्रग्स पंजाबमधून इंग्लंडमध्ये जात होते. ड्रग्स रॅकेटचा “मास्टर माईंड” हा मूळचा पंजाबमधील आहे परंतु तो कुटुंबीयांसह गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये राहत आहे.
सांगली कनेक्शन समोर
पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीतील कुपवाडमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी सुरू केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये 140 किलोच्या 300 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे ड्रग्स मिठाच्या पोत्यात लपवून ठेवले होते. या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयुब मकानदार यांच्यावर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. तो सात वर्ष येरवडा कारागृहात होता.
आयुब कारागृहात असताना पुण्यातील आरोपीशी त्याची ओळख झाली होती. त्यामुळे मकानदार यांच्याकडे हा साठा तात्पुरता स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.