अभिजित पोते, पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात 18 जुलै रोजी दोन दशतवाद्यांना पकडले होते. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांनी पकडल्यानंतर ते दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा (ISIS terrorist Shahnawaz)हा फरार झाला होता. आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शाहनवाज याला बेडया ठोकल्या आहे. त्याच्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात यश आले आहे. पुणे शहरातील या इसिस मॉड्यूल प्रकरणामुळे खळबळ माजली होती.
दिल्ली पोलिसांनी शाहनवाज याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. विशेष पथकाने दिल्लीत काही ठिकाणी छापे टाकले. तीन, चार संशयीत लोकांची चौकशी केली. त्यानंतर दोघांना अटक केली. त्यातील एक दहशवादी दिल्लीच्या बाहेर पकडला गेला तर दुसऱ्यास दिल्लीत अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात शाहनवाजसह तिघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून जिहादी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींचा दिल्लीत घातपात करण्याचा कटीही उघड झाला आहे.
पुणे आयएसआयएस मोड्यूल प्रकरणी फरार शाहनवाजसह रिजवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्लाह फयाज शेख दिल्लीत लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना अटक केली. तिघांनाही सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. मोहम्मद शाहनवाज हा दिल्ली आणि पुणे ISIS मॉडेलचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या रडारवर दिल्ली, राजस्थान, हरयाणा आणि युपी असल्याची माहिती मिळाली.
अटक केलेल्या आरोपींनी सणासुदीच्या काळात बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट रचला होता. शाहनवाज दिल्लीत राहून इसिससाठी स्लीपर सेल तयार करण्याचे काम करत होता. पुणे पोलिसांना मोटारसायकल चोरीच्या माध्यमातून मिळालेले हे प्रकरण देशभर पसरले असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.