पिंपरी चिंचवड : पावसाळ्यात शनिवार-रविवारसह इतर दिवशी पर्यटकांची पावलं धरणांकडे वळतात. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटन स्थळांवर कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. (Pune Khadakwasla Dam Sinhgad Fort Bhushi Dam Tourist to be fined with FIR)
पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद
लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मागील रविवारी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत.
कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी
मागील रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, खेड शिवापूरकडून येणाऱ्या कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात येणार आहे.
पाचशे रुपये दंड आणि गुन्हाही दाखल
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड तर करण्यात येत आहेच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केलं आहे.
भुशी डॅमवरही गर्दी
दरम्यान, लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण परिसरात रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर बंदी आहे. तरी सुद्धा नागरिक बेफिकीरपणे लोणावळा शहरात प्रवेश करत आहेत. त्याच पर्यटकांवर आता लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
लोणावळ्यामधील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांकडून आता तपासणी सुरु करण्यात आली आहे. पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केलेले आहेत. नागरिकांना तपासूनच पुढे सोडण्यात येत आहे. पर्यटनाला आले असल्यास त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
वर्षा सहलीची हौस फिटणार नाही, भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी
(Pune Khadakwasla Dam Sinhgad Fort Bhushi Dam Tourist to be fined with FIR)