पुणे | 10 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरु केले आहेत. कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. ही गँग मोडण्यासाठी त्यांच्या म्होरक्याला अटक केली आहे. या गुन्हेगारांवर मकोका लावला आहे. काही जणांवर तडीपार करण्याची कारवाई केली आहे. शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहचलेल्या कोयता गँगवर सर्वत्र लक्ष ठेवले जात आहे. त्यानंतर कोयता गँगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे आता वेगळाच पॅटर्न पोलिसांनी सुरु केला आहे.
पुणे शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोयता गँगकडून पुणे शहरातील गंगानगर परिसरात अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करत कोयता टोळीने वाहनांची तोडफोड केली होती. पोलिसांनी या कोयता गँगचा शोध सुरु केला. वाहनांची तोडफोड निर्माण करणारे ते गुन्हेगार सापडताच पोलिसांनी कारवाई केली. 24 तासात हडपसर पोलिसांकडून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आकाश गुजले, अभयसिंग सिकंदर सिंग, पृथ्वीराज उर्फ साहिल आव्हाड अशी आरोपींची नावे आहेत.
कोयता गँगने पुण्यातील गंगानगर परिसरात वाहनांची तोडफोड केली होती. या टोळीवर कारवाई करताना कोयता गँगची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. परिसरातून त्यांना फिरवत नेऊन पोलीस ठाण्यात नेले. यामुळे या पुढे कोणताही गुन्हेगार दहशत निर्माण करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल, अशी पद्धत पोलिसांनी सुरु केली.
पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील आरोपीची काढली धिंड#Police #Pune pic.twitter.com/pGaO5dICYh
— jitendra (@jitendrazavar) August 10, 2023
पुणे शहरातील कोयता गँगमुळे पुणेकर हैराण झाले आहे. एका महाविद्यालयीन युवतीवर पेरुगेट पोलीस चौकीजवळ हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी काही युवकांनी त्या युवतीला वाचवले. पुण्यातील कोयता गँगच्या होणाऱ्या दहशतीमुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न त्यांनी मांडला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीसंदर्भात आवाज उठवला होता. या सर्व प्रकारामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी मोडण्यासाठी अनेक पावले उचलली.