पुणे : पुणे (Pune Maval News) जिल्ह्यातील फिरंगाई डोंगरावर गेलेला तरुण पाय घसरुन पडला होता. अखेर जखमी झालेल्या तरुणाला अंधारातून शोधून काढत अखेर त्याचं रेस्क्यू (Pune Tracking) करण्यात आलंय. वन्यजीव रक्षक मावळ (Vanyajiv Rakshak Maval Rescue Team) संस्था या रेस्क्यू टीमने हे बचावकार्य करत तरुणाचा जीव वाचवलाय. मध्यरात्री काळोखात जीवाची बाजी लावत या रेस्क्यू टीमने तरुणाला जीवदान दिलंय. त्यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. हा तरुण आपल्या मित्रांच्या ग्रूपसोबत फिरंगाई डोंगरवार ट्रेकिंगसाठी आला होता. पण त्यादरम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो पडून गंभीर जखमी झाला. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर वन्य जीव रक्षक मावळ या रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न करता या तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला आहे. नाणोली गाव येथील फिरंगाई हा ट्रेकिंगसाठी ओळखला जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक प्रसिद्ध डोंगर आहे. अनेकजण फिरंगाई येथे ट्रेकिंगसाठी येत असतात. पावसात तर ट्रेकिंगसाठी अद्भूत वातावरण फिरंगाई इथं असतं. पण तितकाच फिरंगाईचा ट्रेक हा डेंजरही मानला जातो. त्यामुळे सुरक्षेची सगळी खबरदारी घेत ट्रेकिंग करण्याचं आवाहनही केलं जातं.
जखमी झालेला तरुण हा इंदोरच्या खासगी इस्टिट्यूटमधील विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांच्या ग्रूपसोबत तो ट्रेकिंगसाठी आला होता. फिरंगाई डोंगराच्या दरीत ट्रेकिंग दरम्यान, तो पाय घसरुन पडला होता. अखेर वन्यजीव रक्षक मावळ संस्था ही रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थानप टीम घटनास्थळी रवाना झाले. या टीमने तीन तास अथक परिश्रम घेत, खोल दरीतून जखमी विद्यार्थ्याला काळोख्या अंधारातून शोधून काढलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयाच्या दिशेने घेऊन गेले.
जखमी विद्यार्थ्याला रेस्क्यू टीममधील सहकाऱ्यांनी उचलून बाहेर आणलं आणि मग त्याला रुग्णालयात दाखल केलं. यावेळी आपले प्राण वाचवल्याबद्दल जखमी तरुण विद्यार्थ्यानेही या रेस्क्यू टीमचे आभार मानलेत. अखेर या तरुणाला डोंगराच्या पायथ्याला आणून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पाय घसरुन पडलेला विद्यार्थी सुखरुप बाहेर आल्यानं विद्यार्थ्यांच्या ग्रूपमधील इतर तरुणांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय. सध्या जखमी तरुणावर वैद्यकीय तज्त्रांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत.