खळबळजनक, पुण्यातील चार लोकांच्या मृत्यूच्या घटनेस ‘यू टर्न’, मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालकनेच बस पेटवली
Pune Mini Bus Fire: जनार्दन हंबर्डीकर या आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी ड्रॉयव्हर सिटच्या खाली त्या केमिकलची बॉटल ठेवली. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या.

Pune Hinjawadi Mini Bus Fire: पुणे शहरात बुधवारी खळबळजनक दुर्घटना झाली होती. व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) आग लागली होती. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले. आता मिनी बसला लागलेली ही आग घातपात असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. बसचालकानेच पगार कापल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीचे 12 कर्मचारी बसमधून जात होते. त्या मिनी बसला आग लागली. त्यात सुभाष भोसले, (वय 42), शंकर शिंदे ( वय 60), गुरुदास लोकरे ( वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40) या चौघांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अपघात वाटत होता. परंतु हा अपघात नाही तर घातपात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील सीसीटीव्हीसुद्धा समोर आले आहे. बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच हा प्रकार केला आहे.




पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, व्योम ग्राफिक्स कंपनीतील कामगारांचा असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली. चालक जनार्दन हंबर्डीकर याने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे.
पुण्यात चार जणांचा मृत्यूच्या घटनेस वेगळेच वळण, मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालकनेच बस पेटवली#Pune #punecrime pic.twitter.com/zlVFd2o9HI
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2025
असा रचला कट
जनार्दन हंबर्डीकर या आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी ड्रॉयव्हर सिटच्या खाली त्या केमिकलची बॉटल ठेवली. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडीजवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.