लोणावळा, पुणे : पुणे मुंबई द्रूतगती महामार्गावर शुक्रवारी एक मोठा अनर्थ टळला. चालकाविना सुसाट निघालेल्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. हा ट्रक संरक्षक भिंतीला धडक देत अमृतांजन पुलाखालून जात होता. यावेळी सुदैवानं एकही वाहन मध्ये नव्हतं. त्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या अपघाताचा व्हिडीओ अमृतांजन पुलावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. या ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलाय.
ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याहून सिमेंटची गोणी घेऊन ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. पण वाटेत ट्रकचे ब्रेक निकामी झाली.
अमृतांजन पुलाच्या आधीच ट्रकचे ब्रेक फेल केल्यामुळे ट्रकची आधी एका बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या ट्रक चालकाने धावत्या ट्रकमधून उडी टाकली. त्यामुळे ट्रक पूर्णपणे अनियंत्रित झाला होता. मात्र ट्रक तसाच सुसाट वेगाने पुढं गेला आमि डिव्हायडरचा धडकत धावत राहिला.
तुम्ही जी गाडी घेताय की किती सेफ आहे? कारण तुम्ही कदाचित सुरक्षित गाडी चालवत असाल, तर समोरचा कुठून कसा आणि कधी येऊन तुम्हाला धडकेल, याचा काहीही नेम नाही! पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील शुक्रवारी ब्रेक फेल झाल्यावर काय घडलं पाहा.. #PuneMumbaiExpressHighway #BreakFail pic.twitter.com/Dpj58lLhTZ
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 10, 2022
आधी डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीला आधी ट्रक धडकला. त्याआधी ट्रकच्या मध्ये काही आलेल्या ट्रंकमुळे वेग काहीसा कमी झाला होता. पण धोका टळला नव्हता. अखेर अमृतांजन पुलापुढे गेल्यावर काही अंतरावर हा ट्रक थांबला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
पुण्यातील नवले पुलावर काही दिवसांपूर्वीच ब्रेक फेल झाल्यामुळे एका ट्रकने तब्बल 48 वाहनांना धडक दिली. तशाच पद्धतीचा अपघात पुन्हा होण्याची भीती होती. मात्र यावेळी हायवेवर एकही वाहन मध्ये नसल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला.