गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलीस आक्रमक, पुन्हा केले ‘हे’ ऑपरेशन
Pune Crime News : पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरु केली आहे. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंबन करत आहे. आता पुन्हा मोठे ऑपरेशन पोलिसांनी राबवले आहे.

रणजित जाधव, पुणे, दिनांक 16 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस आक्रमक झाले आहे. कोयता गँगचा धुमाकूळ रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोकोका लावला जात आहे. पुणे जिल्ह्यांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्सन मोडमध्ये आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी दीड हजारापेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले. आता पुणे शहर पोलिसांकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले आहे. त्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई झालीय.
किती जणांवर झाली कारवाई
पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये 115 जणांना अटक केली आहे. तसेच 1824 गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यापैकी 577 गुन्हेगार असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावर विविध कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले.
का झाले पोलीस आक्रमक
पुणे शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलिसांवर चौफेर टीका होत होती. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ काही दिवसांपूर्वी तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी पोलीस चौकीत एकही पोलीस नव्हता. यामुळे आयुक्त रितेश कुमार यांनी काही जणांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच आता प्रत्येक पोलीस चौकीवर २४ तास पोलीस असणार आहे. पुणे शहरात १११ पोलीस चौकी आहेत. त्या २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.




हा ही उपक्रम
पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयातील तरुणांकडे कोयता असल्याचे दिसून आले. मग एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींना धमक्या दिल्या जात आहे. पेरुगेटजवळ तरुणीवर झालेला हल्ला तसाच होता. त्यामुळे पोलिसांनी आता शाळा अन् महाविद्यालयात तक्रार बॉक्स ठेवले आहे. या तक्रार बॉक्समध्ये तक्रार देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे.