गणेश विसर्जनच्या भर मिरवणुकीत गोळीबार, बदला घेण्यासाठी सुपारी, भाजपच्या माजी नगरसेवकाला बेड्या
एका माजी नगरसेवकावर कुख्यात गुंडाने भर मिरवणुकीत गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो नगरसेवक सुदैवाने बचावला. पण याच माजी नगरसेवकाने पुढे हल्लेखोर गुंडाला मारण्याची सुपारी दिली.
पुणे : आपण ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट बघितला आहे. या चित्रपटात पुण्यातील गुन्हेगारी विश्वावर अतिशय मार्मिक आणि अचूकपणे भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर काही काळासाठी आपण सुन्नं होतो. गुन्हेगार किती सहजतेने भर दिवसा, भर रस्त्यावर हत्या करतो हे त्यामध्ये आपण बघितलं आहे. चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे अगदीच तशीच घटना चार वर्षांपूर्वी पुण्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत घडली होती. एका माजी नगरसेवकावर कुख्यात गुंडाने भर मिरवणुकीत गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो नगरसेवक सुदैवाने बचावला. पण याच माजी नगरसेवकाने पुढे हल्लेखोर गुंडाला मारण्याची सुपारी दिली. याप्रकरणी पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी माजी नगरसेवकाला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित माजी नगरसेवकाचं नाव विवेक यादव असं आहे. तो भाजपचा पुण्यातील लष्कर कॅन्टोमेंट वार्डाचा माजी नगरसेवक आहे. त्याने दोन जणांना कुख्यात गुंड बबलू गवळी याला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. यासाठी त्याने दोघांकडे 3 पिस्तूले, 7 काडतुसे आणि रोख रक्कमही दिली होती. या दोघांची राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख अशी नावं आहेत. पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी दोघांना पिस्तूल पाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता संबंधित प्रकार उघडकीस आला.
राजमणीला पकडल्यानंतर विवेक यादव फरार
विवेक यादव याने ज्या राजमणीकडे बबलूची सुपारी दिली होती तो कुख्यात गुंड आहे. हा गुंड कोरोनामुळे सध्या जामिनावर बाहेर आला होता. पण याच गोष्टीचा फायदा घेत विवेक यादव याने त्याला हेरत बबलू गवळीच्या हत्येची सुपारी दिली. राजमणीला बेड्या ठोकल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. पण तेव्हापासून विवेक यादव हा फरार झाला.
पोलिसांनी विवेक यादवला कसं पकडलं?
पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. यादरम्यान राजस्थान गुजरात बॉर्डरवर विवेक यादव असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरात बॉर्डवर जाऊन त्याला बेड्या ठोकल्या.
हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप, संधी मिळताच कोविड सेंटरमधून पळ, रायगड पोलिसात खळबळ