हिट अँड रन प्रकरणात आजची सर्वात मोठी अपडेट, ‘त्या’ अधिकाऱ्याकडून तपास काढला; पुढील तपास कोण करणार?
पुणे पोलीस आयुक्तांनी हिट अँड रन प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हातून तपास काढून घेत दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास वर्ग केला आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यात 20 एप्रिलला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका श्रीमंत उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या भरधाव पोर्शे कारने दोन जणांना उडवलं होतं. या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुणे पोलिसांवर टीका केली जात होती. कारण घटनेनंतर आरोपीला लगेच जामीन मिळाला होता. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर आरोपी मुलगा हा 17 महिने आणि 8 महिन्यांचा असल्याने त्याला बाल हक्क न्यायालयाने बाल सुधारणगृहात पाठवलं आहे. या प्रकरणी पोलिसांची जोरदार कारवाई सुरु आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वत: या प्रकरणी पोलीस तपासाकडे लक्ष ठेवून आहेत.
विशेष म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणी तपास करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा दोघांनी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी ‘त्या’ अधिकाऱ्याकडून तपास काढला
याच प्रकरणातील आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विद्यमान अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास वर्ग केला आहे. पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्याने पोलीस आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कल्याणी नगर अपघाताचा तपास केला जाणार आहे.
येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे येरवडा अपघात प्रकरणाचा तपास करणार आहेत.