Pune Police : पुणे पोलिसांची धडक कारवाई, दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीचा मुसक्या बांधल्या

| Updated on: Aug 24, 2023 | 1:52 PM

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी गुंड टोळीविरोधात मोहीम सुरु केली आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

Pune Police : पुणे पोलिसांची धडक कारवाई, दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीचा मुसक्या बांधल्या
pune Polilce
Follow us on

पुणे | 24 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगच्या कारवाई अधूनमधून सुरु असतात. चोरी, दरोडे आणि हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. यामुळे पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झाले आहे. पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दहशत माजवणाऱ्या टोळींची धिंड काढली जात आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत बसत आहे. आता पुणे शहरातील विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या टोळीवर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. या टोळीवर मकोका लावला आहे.

कोणत्या टोळीवर झाली कारवाई

विमाननगर भागात प्रसाद गायकवाड यांची गुंड टोळी सक्रीय होती. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. या टोळीमधील प्रसाद संपत गायकवाड (वय 25, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय 24 येरवडा, पुणे), बबलू संतोष गायकवाड (वय 22 ,विमाननगर,पुणे) यांना मकोका लावला आहे. रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर 52 गुंड टोळ्यांविरुद्ध मकोका लावला आहे.

काय आहेत आरोप

प्रसाद गायकवाड यांच्या टोळीतील आरोपी दहशत निर्माण करत होते. विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून त्यांनी लुटले होते. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांच्यावर दरोडा, तोडफोड, दहशत माजवणे, शस्त्रे बाळगणे हे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे गुन्हे कमी झाले नव्हते. यामुळे आता थेट मकोका लावण्यात आला आहे.

कोणी दिला होता प्रस्ताव

विमानतळ पोलिस ठाण्याचे पीआय विलास सोंडे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यांनी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर मकोकाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.