Pune News : पुणे पोलिसांना अमेरिकेतून फोन, दहशतवाद्यांची माहिती देत…
Pune Cirme News : पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. हा फोन दहशतवादी असल्याचा संदेश देणारा होता. यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. फोन अमेरिकेतून आला आहे.
प्रदीप कापसे, पुणे | 22 ऑगस्ट 2023 : पुणे शहर दहशवाद्यांच्या रडारवर आहे. पुण्यात दोन दहशवादी सापडल्यानंतर दहशतवाद्यांची एक साखळीच कार्यरत असल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच या सर्व प्रकारांमुळे एनआयएचे लक्ष पुणे शहरावर केंद्रीत झाले आहे. पुण्यातील अशी संवेदनशील परिस्थिती असताना पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने दहशतवादी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला आहे. या फोनमधील सत्य उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
काय होता फोन
पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला. मुंबई आणि पुणे शहरात नुकतेच दहशतवादी सापडले होते. या घटनांचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा फोन गांभीर्याने घेतला आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती लागलीच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले. यामुळे फोन अमेरिकेतूनच आल्याचे स्पष्ट झाले आहे.
खोडसाळपणा की सत्य
पुणे पोलिसांना आलेला हा फोन अमेरिकेतून आल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु फोन करणाऱ्याने पूर्ण माहिती दिली नाही. फक्त मुंबईत दहशवतवादी असल्याचे सांगत फोन कट केला. यामुळे माहिती देणाऱ्याने खोडसाळपणा केला की सत्य सांगितले, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आता मुंबई पोलीस यासंदर्भात केंद्रीय संस्थांची मदत घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत अमेरिकेतील त्या फोनचे गुढ बाहेर काढले जाणार आहे.